विनोथ तामिळनाडूच्या रामेश्वरमजवळ परमकुडीचा. इकडे एका कार्यक्रमासाठी आला होता. आज काय करायचं तर शाळेत जाऊयात म्हटल्यावर लगेच तयार झाला. दुर्गम मराठी शाळेला भेट देण्याची ही त्याची पहिलीच वेळ.
राधानगरी भागातील शक्य त्या पर्यटन स्थळांना तो भेटी देत आहे, आमची शाळा देखील त्याच्यासाठी एक छानसे पर्यटन ठिकाणच होते. दुचाकी डोंगरातून नीट जाणार नाही म्हटल्यावर हा पठ्या माझ्या सोबत एक दीड किलोमीटर अगदी आरामात डोंगर चढला.
शाळेजवळ आल्यावर अगदी अवाक होऊन तो शाळा निरखून पाहू लागला. एवढ्या डोंगराळ भागात अश्या निसर्गरम्य वातावरनात भरणारी शाळा पाहून तो जाम खुश झाला.
कोरोनाच्या स्थितीतही योग्य ती काळजी घेऊन समूह अध्यापन सुरू असल्याने शाळेत उपस्थित मुलांनी त्याचे स्वागत केले. त्याला मराठी येत नसल्याने मला मुलांच्यातील आणि त्याच्यातील ट्रान्सलेटरची भूमिका बजावायची वेळ आली. तो अगदी छान इंग्रजी बोलतो त्याचा अनुवाद मराठीत करून मी मुलांना सांगत होतो. मुलांनी ओळख करून घेतल्यावर याने मुलांना "तुम्ही मला तुमच्या मराठीतील मुळाक्षरे शिकवा"असे सांगितले तशी मुलांनी देखील अगदी मनापासून योग्य तो उच्चार करत,फलक लेखन करून मुळाक्षरे विनोदला समजावून सांगितली मग विनोदने देखील तामिळी भाषेतील मुळाक्षरे मुलांना गिरवून दाखवली.
मुलांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्याने दिली. तामिळनाडू मधील प्राणी, पक्षी, घरे इथपासून ते जेवणासंबंधी अश्या सगळ्या बाबी मुलांनी समजून घेतल्या.
भाषेचा अडसर दूर सारत वेगळ्या प्रांतातील हा दोस्त मुलांच्यातीलच एक होऊन ग्राऊंडवर क्रिकेट कधी खेळू लागला समजलंच नाही. सोबतच आमच्या मुलांना देखील त्याने प्रांत, भाषा, संस्कृती जरी वेगळी तरी भारतीय आम्ही' याचा छानसा अनुभव देऊन गेला.
- हर्षल जाधव
विद्या मंदिर हुंबेवाडा
9637351400