बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

अमृता इमरोझ एक प्रेमकहाणी...प्रेम अध्यायाचे पारायण - हर्षल जाधव




             एखादं पुस्तक मनापासून आवडाव आणि त्यांची पारायणावर पारायण घडावी असं क्वचितच घडतं. हे पुस्तक मी पहिल्यांदा 12 वी सायन्स मध्ये असताना वाचलं... पुन्हा डी.एड  ला असताना ते परत हातात आलं नंतर असच एका मित्राच्या घरी गेलो असता तेथे मला ते पुन्हा भेटल आणि परवा रत्नागिरी नगर वाचनालयात गेलो असता त्याची आणि माझी पुन्हा नजरा नजर झाली आणि परत एक पारायण घडलं...
          प्रेम कथा म्हटलं की आपल्याला हीर रांजा लैला मजनू अश्या एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या आणि प्रेमासाठी स्वतः च्या जीवाची देखील परवा न करणाऱ्या जोड्या आठवतात पण एकाच आयुष्यात दोघांजनांवर तेवढ्याच ताकदीने प्रेम करनारी रिअल लाइफ मधील नायिका भेटते ती याच पुस्तकातून..
अमृता-इमरोझ अ लव्ह स्टोरी या उमा त्रिलोक यांच्या इंग्लिश पुस्तकाचं भाषांतर अनुराधा पुनर्वसू यांनी केलं "अमृता-इमरोझ एक प्रेम कहाणी" या नावानं.. या पुस्तकात आपल्याला फक्त अमृता-प्रीतम किंवा इमरोझ भेटत नाहीत.. तर सापडतो एक सच्चेपणा आणि दुर्मिळ अशी प्रेमभावना..जी शारिरीक  प्रेमाच्याही पलीकडे जाते..
        'अमृताजी' वाचकांचे आस्मान उंचावणारी हि लेखिका.. साहित्य जगतातला सर्वोच्य मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पदमश्री  आणि पदमविभूषण हे दोन्ही किताब त्यांना मिळाले आहेत. सहा विद्यापीठानी डी .लिट पदवी  देऊन त्यांचा सन्मान केला आहे.. सहस्त्रकाची कवयत्री म्हणूनही  त्यांना मानलं जातं .. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचा साखरपुडा झाला , अकराव्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले, सोळाव्या वर्षी पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले अन् सोळाव्या वर्षीच प्रीतमसिंहांशी विवाह झाला. पुढे साहीरवर त्यांचे उत्कट प्रेम जडले जे अखेरच्या श्वासापर्यंत टिकून होते.  साहिर मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावायला आले आणि मग इथलेच झाले. चित्रपट गीतकार आणि शायर म्हणून त्यांनी अमाप ख्याती मिळवली. साहीर मुंबईला गेले आणि त्या मायानगरीचाच झाले, या वास्तवानं अमृता एकीकडे आतून उन्मळून पडल्या. उद्ध्वस्त झाल्या. तर दुसरीकडे साहीर यशाच्या पायऱ्या चढत गेले याचाही अमृतांना आनंद झाला. पुढे साहीरसाठी अमृतांनी लिहिलेल्या ‘आखरी खत’चं कव्हर तयार करण्यासाठी म्हणून चित्रकार इमरोजशी त्यांची पहिली भेट १९५८ मध्ये झाली. आणि हि भेट पुढील आयुष्य एकत्रच राहण्यात झाली. ते पुढे एकमेकांबरोबर पन्नास वर्षे एकत्र राहिले. तेही कुठल्याच कायदेशीर नात्याचा अट्टहास न करता. फक्त प्रेमाच्या नात्यावर त्यांचा संसार झाला. 60-65 वर्षांपूर्वीची ही गोष्ट म्हणजे एक क्रांतीच होती...या क्रांतीचीच उत्तर कथा लेखिकेने या पुस्तकात मांडली आहे.
         अमृता-इमरोझच्या आयुष्यातले एकेक किस्से लेखिका सदरच्या पुस्तकात गुंफत जाते. अधेमधे त्यावर भाष्यही करते. ओघवत्या भाषाशैलीमुळे वाचकाच्या समोर ते प्रसंगच उभे राहतात. दोन मुलांची आई आणि विवाहित असलेल्या असलेल्या अमृताजींचा इमरोझबरोबर राहण्याचा निर्णय म्हणजे खूप मोठं बंडच होतं. त्यावर लेखिका म्हणते, 'बदल पाहिजे बदल पाहिजे अशा गप्पा आपण मारतो. पण प्रत्यक्षात बदल घडून येतो, तेव्हा मात्र घाबरतो. अमृता-इमरोझनं स्त्री-पुरुष संबंधाबद्दलची नवी वेगळी भाषा दिली आहे.'.. 
आणखी एका ठिकाणी आपलं प्रेम विषयीचं मत व्यक्त करताना त्या म्हणतात " प्रेमाच्या दोन जाती आहेत . एक प्रेम आभाळासारख असतं तर दुसरं डोक्यवरच्या छपरासारख असतं. साहिर लुधियानवी त्यांच्यासाठी आभाळासारखे होते. बाईला दोन्ही हवं असतं . प्रसंगी छप्परच आभाळ होतं." लेखिका जसे स्वतःची मते मांडत जाते तशीच अमृता- इमरोज यांच्या दिलखेचक संवाद देखील शब्दबद्ध करत जाते..
अमृताजी जगण्या मरण्याची भाषा करत असताना इमरोझ यांना म्हणतात "तुझ्याशिवाय जगणं म्हणजे मरणच मला एवढ्यात मरायचं नाही ." तू एकदा बाहेर जाऊन जग बघून घे . परत आल्यावर सुद्धा तुला माझ्याबरोबरच राहावंसं वाटल तर तू सांगशील ते ऐकायला मी तयार आहे." इमरोज नि त्यांच्या  छोट्याश्या खोलीत तीन फेऱ्या मारल्या आणि म्हणाले, "बघ झाल माझं जग पाहून !" असं हे विलक्षण नातं वाचताना मन हरपून जात.. अमृताजींना जेंव्हा त्यांच्या व इमरोजच्या नात्याविषयी विचारलं जातं तेंव्हा त्या ठामपणे म्हणतात , " ज्या जोडप्याना परस्परांच्या प्रेमाची खात्री नसते , त्यांनाच समाजाच्या मान्यतेची गरज भासते. आम्ही आमची मन पूर्णपणे जाणतो आहोत ; मग समाजाची लुडबुड  हवीच कशाला... "
अजून एक असाच  किस्सा असा आहे की दोघं मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येत होते. ट्रेनमध्ये सामानात काही दारू वा मादक पदार्थ आहेत का हे तपासायला पोलीस आले. अमृता प्रीतम म्हणतात - 'आमच्यापाशी तसं काही नाही, याची खात्री करून घेऊन त्यांनी आम्हाला सोडून दिलं. पण एकमेकांबरोबर असण्याची नशा आम्हाला पुरेशी आहे, हे त्यांना माहीत नव्हतं. आमची नशा ते थोडीच उतरवू शकणार होते.' एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेपणाची जाणीव त्यांच्या या संवादातून वाचकाला होत जाते. हि सगळी वाक्ये आणि त्याचे आयुष्य हे जरी एक परिकथा वाटल असले, तरी याला वास्तवाची झालर आहे. म्हणूनच अमृताजींचं साहिर सुधियानींवर असलेल्या प्रेमाचाही उल्लेख येतोच आणि त्याचा स्वीकार इमरोझनी केलाच होता. अमृताजी इमरोझपेक्षा वयानं मोठ्या. त्यांच्या आजारपणात इमरोझनी त्यांची खूप सेवा केली. इमरोझ हे मोठे चित्रकार होते.. पण अमृताजींपुढे ते तसे झाकोळलेले राहिले. त्यावर ते स्वत: म्हणतात, 'लोक म्हणतात की तुमचं आयुष्य तुम्ही केवळ अमृताला वारा घालण्यातच व्यतीत केलं. पण त्यांना हे माहीत नाही की तिला वारा घालता घालता मलाही हवा लागत होती.'
        या पुस्तकाच्या लेखिका उमा त्रिलोक यांनी अमृता आणि इमरोज यांच्या नात्याचे इतके पैलू मांडलेत जे वाचताना थक्क व्हायला होतं.. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अमृता किंवा इमरोझला महान बनवलं नाही. की स्वत:चा उदोउदोही केला नाही. ही माणसांची गोष्ट आहे. त्यांच्या गुणदोषांसकट.. पण ही माणसंच अनोखी आहेत.एके ठिकाणी इमरोझ म्हणतात, अमृताची भेट झाल्यापासून माझ्यातली रागाची भावना लुप्त झाली. प्रेमाची भावना प्रबळ झाल्यामुळे द्वेष, राग, मत्सर यांना थाराच नसावा. प्रकाश असेल तिथे अंधार असेल का?

         आपल्या आजूबाजूला मनाच्या आणि रक्ताच्या नात्यांतली असुया, कडवटपणा आपण पाहत असतो. अनुभवत असतो. अनेक जण मी, माझं, मला या वर्तुळात फिरत असतात. या सर्व परिस्थितीत हे पुस्तक हाती पडतं आणि ते वाचल्यावर आनंदाची लहर आपल्या मनात बराच काळ तरंगत राहते..अमृताजींचे  हिमतबाज, बहुरंगी व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचायला हव. जीवनाचा खरा अर्थ अन् प्रेमातलं जगणं शोधायचं असेल तर अमृता-इमरोजच्या प्रेम अध्यायाचे हे पारायण पुन्हा पुन्हा व्हायलाच हवे...