सुनील दोस्ता ,
तुझ असं अचानक निघून जाण मनाला प्रचंड वेदना देवून गेलय. आम्ही अस्वस्थ आहोत. तु गेल्याची बातमी ऐकली आणि मनावर प्रचंड असं दडपण मनावर आलंय. बालपणीच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. तुला आठवतय 4थी पास होऊन आपण हायस्कूल ला आलो होतो. तेंव्हा 5 वी लानवीन शाळा,
नवीन शिक्षक, नवीन मित्र-मैत्रिणी. अगदी शाळा सुरू होऊन महीनाही न झालेला आणि आपल्याला काय काय येत हे जाणून घ्यायची शिक्षकांना दांडगी हौस निर्माण झाली होती. आपण सगळे घाबरलो होतो. आपल्या अंगात तश्या अनेक कला होत्या पण एवढ्या सगळ्या मुलांसमोर जावून बोलायचं हे धाडस काय आपल्यापैकी कोणालाच होत नव्हत..आपण सगळे गप्प होतो...पोटात भितीचा गोळा आला होता. आता पुढं जाणार कोण हाच प्रश्न होता आणि अचानक तु उठलास आणि मोठी हिम्मत करून समोर गेलास आणि छानसं अंगाई गीत म्हणालास..आम्ही सगळे त्यावेळी स्तब्धच झालो होतो...तु तेंव्हा भलतच डेरिग केलं होतस. तुझ हे धाडस बघून मग बाकीचे फटाफट जाग्यावरून उठून काहि ना काहीतरी सादर करू लागले. मला वाटतं आपलं ते स्टेजशी नातं जोड़ायचं पहिल कारण असावं.
शाळेतील सहल,क्रीडा महोत्सव यात तुझा सहभाग मोठा असायचा.अश्या वेळी सगळ्या मित्रांना एकत्र ठेवण्याची कला तुला छान जमायची. आमच्या त्यावेळच्या टीमचा तु अघोषीत कप्तानच होतास.
वार्षिक स्नेहसंमेलनाची तारीख जाहीर झाली की नाटक डान्स बसवायला आपली लगबग सुरू व्हायची. सराव करायला जागा शोधायलाच आपला बराच वेळ जायचा. तेंव्हा आता सारख्या बुडाखाली गाड्या नव्हत्या. सगळा प्रवास पायीच करावा लागायचा. पाय प्रचंड दूखायचे. सरावासाठी जागा मिळाली की मग आपला प्रवास टेपरेकॉडर व कॅसेट शोधायला सुरू व्हायचा. अनेकांचे उंबरे झिजवल्यावर मोठ्या मुश्किलीने कोणी तर टेपरेकॉडर द्यायला तयार व्हायचा. तो घेवुन मोठ्या आनंदाने आपला सराव सुरू व्हायचा. शिकवायला कोणी नसल्याने एकमेकांना समजावून घेत "असं नव्हे, असं करू" असं म्हणत नाटक डान्स बसवायचौ. ऐन स्नेहसंमेलनाच्या दिवशी आपल्या पात्राला साजेशी कपड़े शोधायला आपण गावभर फिरायचौ. अशी सगळी जमवाजमव केल्यावर स्टेजला आग लावणारा performans आपण द्यायचौ.. त्याची चर्चा पुढे अनेक दिवस व्हायची. या सगळ्या सगळ्या आठवणी आज ताज्या होत आहेत. या आठवणीच्या प्रत्येक किस्स्यात तु अजूनहि तसाच जिवंत आहेस..
तुला आठवतय 'राजकारण मोड़क्या खुर्चीचे' हे आपलं नाटक आपले मांगोरे सर बसवत होते. तु सरपंच आणि मी चेअरमन अशी पात्रे आपल्याला मिळाली होती. या नाटकाचा 23 वा प्रयोग आपल्याला मुंबईला करायचा होता त्यामुळे नाटकाची तालीम जोरात सुरू होती. यात एक प्रसंग असा होता की, चेअरमन म्हणजे मी सरपंचाला कानाखाली वाजवनार असतो पण आपल्याला काही केल्या तो प्रसंग जमत नव्हता. आपण तो प्रसंग गंभीरतेने न करता हसत करत होतो...शेवटी मांगोरे सरांना राग आला. त्यानी स्वत तो प्रसंग करून दाखवतो म्हणून उभा राहिले आणि डाइलॉग म्हणता म्हणता तुला जोरात कानाखाली वाजवली..आम्हाला वाटलं तु सांगितल्या प्रमाणे हात आडवा घेतला असशील पण घडलं भलतचं. तो सीन पूर्ण झाल्यावर तुझ्या कानाखाली पाहिलं तर खरोखरच तुला कानाखाली बसली होती...ती ईतकी जोरात लागली होती की तुझ्या गालावर चार बोटे स्पष्ट दिसत होती पण तु त्याकडे दुर्लक्ष करून तो सीन अगदी व्यवस्थित केला होतास... तो प्रसंग आठवून आपण अनेकदा हसलो होतो..अश्या आठवणींनी आपलं बालपण तु खऱ्या अर्थाने समृद्ध केलं होतस...
लहानपणी गावात मोठ्या पडद्यावर जेंव्हा पिक्चर दाखवायचे किंवा गावात एखादा ओर्केस्टा असायचा तेंव्हा आपली जागा ठरलेली असायची...आपला ग्रूप एकत्र असायचा. अनेक वेळा मी तुझ्याच मांडीवर झोपी जायचो आणि तु देखील कितीहि अवखडला तरी माझी झोपमोड़ होऊ द्यायचा नाहीस..तशी झोप उभ्या आयुष्यात मला परत कधीच लागली नाही रे...
पुढे 10 वीला असताना तुझ्यात आणि माझ्यात जोराच भांडण झालं ते भांडण एवढं टोकाच होतं की पुन्हा एकमेकांचं तोंड पहायचं नाही असंच जणू आपण ठरवलं होत. भांडणाचं कारण तसं खूपच बालिश होत. अंगातील उर्मी एकमेकांना समजून घ्यायला अडथळा ठरली आणि आजच्या एवढा समजूतदारपणा तेंव्हा नव्हता त्यामुळे एकमेकांची समजूत काढायचा मार्ग आपण वापरलाच नाही.
याचा परिणाम म्हणून पुढे अनेक वर्षे आपण बोललोचं नाही..त्यात शिक्षणासाठी आपल्या वाटा बदलल्या. शिक्षणासाठी दोघेहि गावच्या बाहेर असल्याने परत कधी एकत्र येण्याचा प्रसंगच आला नाही.
पण आता एक- दोन वर्षा मागे एका मित्राच्या लग्नात आपण भेटलो आणि ईतक्या दिवसांची द्वेषाची साखळी गळून पडून आपण एकमेकांशी अगदी दिलखुलास बोललो आणि आपल्या मैत्रीचा तो निखळ झरा पुन्हा नव्याने व्हाऊ लागला..
नंतर काही दिवसांनी मला नोकरी लागल्याची बातमी ऐकूण लगेच माझ अभिनंदन करायला तु फोन केला होतास तेंव्हा मला खुप आनंद झाला होता..
मित्रा तु आम्हाला सोडून गेला आहेस यावर आमचा अजूनहि विश्वास बसत नाही म्हणून
पुन्हा त्या शाळेच्या बाकावर तुझ्या सोबत बसायचं आहे त्यासाठी तरी फक्त एकदा परत ये...!
एकाच ताटात जेवायची मजा पुन्हा अनुभवायची आहे त्यासाठी तरी फक्त एकदा परत ये...!
रात्र जागवून नाटकाची तालीम पुन्हा करायची आहे त्यासाठी तरी फक्त एकदा परत ये....!
मामाचा गरम वडा आपली वाट बघतोय
त्यासाठी तरी फक्त एकदा परत ये....!
खालच्या गोंडाला पुन्हा एकदा तुझ्या हातच जेवण जेवायचं आहे त्यासाठी तरी फक्त एकदा परत ये....!
गजानन महाराजांच्या पालखीला तुझ्या सोबत यंदा खांदा द्यायचा म्हणतोय.
त्यासाठी तरी फक्त एकदा परत ये...!
फक्त एकदा परत ये...!!
मित्रा,
तु शरीराने गेला आहेस,
आठवणीने नेहमी आमच्या सोबत असशील...
नेहमीच सोबत असशील..
तुझा बालपणीचा दोस्त
- हर्षल जाधव
9637351400
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा