सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

सुनिल तुला शब्दपुष्पांजली...🙏

सुनील दोस्ता ,
तुझ असं अचानक निघून जाण मनाला प्रचंड वेदना देवून गेलय. आम्ही अस्वस्थ आहोत. तु गेल्याची बातमी ऐकली आणि मनावर प्रचंड असं दडपण मनावर आलंय. बालपणीच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. तुला आठवतय 4थी पास होऊन आपण हायस्कूल ला आलो होतो. तेंव्हा 5 वी लानवीन शाळा,
नवीन शिक्षक, नवीन मित्र-मैत्रिणी. अगदी शाळा सुरू होऊन महीनाही  न झालेला आणि आपल्याला काय काय येत हे जाणून घ्यायची शिक्षकांना दांडगी हौस निर्माण झाली होती. आपण सगळे घाबरलो होतो. आपल्या अंगात तश्या अनेक कला होत्या पण एवढ्या सगळ्या मुलांसमोर जावून बोलायचं हे धाडस काय आपल्यापैकी कोणालाच होत नव्हत..आपण सगळे गप्प होतो...पोटात भितीचा गोळा आला होता. आता पुढं जाणार कोण हाच प्रश्न होता आणि अचानक तु उठलास आणि मोठी हिम्मत करून समोर गेलास आणि छानसं अंगाई गीत म्हणालास..आम्ही सगळे त्यावेळी स्तब्धच झालो होतो...तु तेंव्हा भलतच डेरिग केलं होतस. तुझ हे धाडस बघून मग बाकीचे फटाफट जाग्यावरून उठून काहि ना काहीतरी सादर करू लागले. मला वाटतं आपलं ते स्टेजशी नातं जोड़ायचं पहिल कारण असावं.
शाळेतील सहल,क्रीडा महोत्सव यात तुझा सहभाग मोठा असायचा.अश्या वेळी सगळ्या मित्रांना एकत्र ठेवण्याची कला तुला छान जमायची. आमच्या त्यावेळच्या टीमचा तु अघोषीत कप्तानच होतास.
वार्षिक स्नेहसंमेलनाची तारीख जाहीर झाली की नाटक डान्स बसवायला आपली लगबग सुरू व्हायची. सराव करायला जागा शोधायलाच आपला बराच वेळ जायचा. तेंव्हा आता सारख्या बुडाखाली गाड्या नव्हत्या. सगळा प्रवास पायीच करावा लागायचा. पाय प्रचंड दूखायचे. सरावासाठी जागा मिळाली की मग आपला प्रवास टेपरेकॉडर व कॅसेट शोधायला सुरू व्हायचा. अनेकांचे उंबरे झिजवल्यावर मोठ्या मुश्किलीने कोणी तर टेपरेकॉडर द्यायला तयार व्हायचा. तो घेवुन मोठ्या आनंदाने आपला सराव सुरू व्हायचा. शिकवायला कोणी नसल्याने एकमेकांना समजावून घेत "असं नव्हे, असं करू" असं म्हणत नाटक डान्स बसवायचौ. ऐन स्नेहसंमेलनाच्या दिवशी आपल्या पात्राला साजेशी कपड़े शोधायला आपण गावभर फिरायचौ. अशी सगळी जमवाजमव केल्यावर स्टेजला आग लावणारा performans आपण द्यायचौ.. त्याची चर्चा पुढे अनेक दिवस व्हायची. या सगळ्या सगळ्या आठवणी आज ताज्या होत आहेत. या आठवणीच्या प्रत्येक किस्स्यात तु अजूनहि तसाच जिवंत आहेस..

तुला आठवतय 'राजकारण मोड़क्या खुर्चीचे' हे आपलं नाटक आपले मांगोरे सर बसवत होते. तु सरपंच आणि मी चेअरमन अशी पात्रे आपल्याला मिळाली होती. या नाटकाचा 23 वा प्रयोग आपल्याला मुंबईला करायचा होता त्यामुळे नाटकाची तालीम जोरात सुरू होती. यात एक प्रसंग असा होता की, चेअरमन म्हणजे मी सरपंचाला कानाखाली वाजवनार असतो पण आपल्याला काही केल्या तो प्रसंग जमत नव्हता. आपण तो प्रसंग गंभीरतेने न करता हसत करत होतो...शेवटी मांगोरे सरांना राग आला. त्यानी स्वत तो प्रसंग करून दाखवतो म्हणून उभा राहिले आणि डाइलॉग म्हणता म्हणता तुला जोरात कानाखाली वाजवली..आम्हाला वाटलं तु सांगितल्या प्रमाणे हात आडवा घेतला असशील पण घडलं भलतचं. तो सीन पूर्ण झाल्यावर तुझ्या कानाखाली पाहिलं तर खरोखरच तुला कानाखाली बसली होती...ती ईतकी जोरात लागली होती की तुझ्या गालावर चार बोटे स्पष्ट दिसत होती पण तु त्याकडे दुर्लक्ष करून तो सीन अगदी व्यवस्थित केला होतास... तो प्रसंग आठवून आपण अनेकदा हसलो होतो..अश्या आठवणींनी आपलं बालपण तु खऱ्या अर्थाने समृद्ध केलं होतस...
लहानपणी गावात मोठ्या पडद्यावर जेंव्हा पिक्चर दाखवायचे किंवा गावात एखादा ओर्केस्टा असायचा तेंव्हा आपली जागा ठरलेली असायची...आपला ग्रूप एकत्र असायचा. अनेक वेळा मी तुझ्याच मांडीवर झोपी जायचो आणि तु देखील कितीहि अवखडला तरी माझी झोपमोड़ होऊ द्यायचा नाहीस..तशी झोप उभ्या आयुष्यात मला परत कधीच लागली नाही रे...

पुढे 10 वीला असताना तुझ्यात आणि माझ्यात जोराच भांडण झालं ते भांडण एवढं टोकाच होतं की पुन्हा एकमेकांचं तोंड पहायचं नाही असंच जणू आपण ठरवलं होत. भांडणाचं कारण तसं खूपच बालिश होत. अंगातील उर्मी एकमेकांना समजून घ्यायला अडथळा ठरली आणि आजच्या एवढा समजूतदारपणा तेंव्हा नव्हता त्यामुळे एकमेकांची समजूत काढायचा मार्ग आपण वापरलाच नाही.

याचा परिणाम म्हणून पुढे अनेक वर्षे आपण बोललोचं नाही..त्यात शिक्षणासाठी आपल्या वाटा बदलल्या. शिक्षणासाठी दोघेहि गावच्या बाहेर असल्याने परत कधी एकत्र येण्याचा प्रसंगच आला नाही.
पण आता एक- दोन वर्षा मागे एका मित्राच्या लग्नात आपण भेटलो आणि ईतक्या दिवसांची द्वेषाची साखळी गळून पडून आपण एकमेकांशी अगदी दिलखुलास बोललो आणि आपल्या मैत्रीचा तो निखळ झरा पुन्हा नव्याने व्हाऊ लागला..
नंतर काही दिवसांनी मला नोकरी लागल्याची बातमी ऐकूण लगेच माझ अभिनंदन करायला तु फोन केला होतास तेंव्हा मला खुप आनंद झाला होता..

मित्रा तु आम्हाला सोडून गेला आहेस यावर आमचा अजूनहि विश्वास बसत नाही म्हणून
पुन्हा त्या शाळेच्या बाकावर तुझ्या सोबत बसायचं आहे त्यासाठी तरी फक्त एकदा परत ये...!

एकाच ताटात जेवायची मजा पुन्हा अनुभवायची आहे त्यासाठी तरी फक्त एकदा परत ये...!

रात्र जागवून नाटकाची तालीम पुन्हा करायची आहे त्यासाठी तरी फक्त एकदा परत ये....!

मामाचा गरम वडा आपली वाट बघतोय
त्यासाठी तरी फक्त एकदा परत ये....!

खालच्या गोंडाला पुन्हा एकदा तुझ्या हातच जेवण जेवायचं आहे त्यासाठी तरी फक्त एकदा परत ये....!

गजानन महाराजांच्या पालखीला तुझ्या सोबत यंदा खांदा द्यायचा म्हणतोय.
त्यासाठी तरी फक्त एकदा परत ये...!
फक्त एकदा परत ये...!!

मित्रा,
तु शरीराने गेला आहेस,
आठवणीने नेहमी आमच्या सोबत असशील...
नेहमीच सोबत असशील..

तुझा बालपणीचा दोस्त
- हर्षल जाधव
9637351400

Posted on by हर्षल जाधव | No comments

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

कलासक्त बाबासाहेब...

#उत्तम तबलावादक #व्हायोलीनवादक #दिग्दर्शक #शिल्पकार #क्रिकेटपट्टू

बाबासाहेबांना विविध कलांची उत्तम जान होती...

ते वयाच्या बारा - तेराव्या वर्ष उत्तम तबला वाजवत..स्थानिक भजनीमंडळात आपल्या तबला वादनाची चुणुक ते वेळोवेळी दाखवत...
एकदा गल्लीतल्या भजनाच्या कार्यक्रमाला तबला वाजवणारा माणूस आला नाही त्यावेळी स्वतः डॉ.आंबेडकर यांनी खूप छान तबला वाजवला, त्यावेळी लोकांनी तोंडात बोटे घातली.

आवड म्हणुन ते व्हायोलिन सुध्दा शिकले होते...
"किंग लियर" या नाटकाचा "शहानी मुलगी" नावाने मराठी अनुवाद करुन त्याचं फ़क्कड प्रहसन त्यांनी सादर केलं होतं..
देवलांच्या "संगीत शारदा" या नाटकाचं बाबासाहेबांनी दिग्दर्शनही केलं होतं...

शेलींगकर गुरुजींकडून ते चित्रकला शिकले आणि मडिलगेकर उर्फ बापू यांच्याकडून शिल्पकलेचं मिळवलं होतं..त्यांनीच डोळे उघडे असलेले गौतम बुध्द घडवले...

स्टॉक मार्केट च्या एकुण कारभारात बाबासाहेबांना विशेष रस होता. त्यासाठी त्यानी स्वताची कंपनी देखिल सुरु केली होती कंपनीचं नाव होतं..
'स्टॉक्स अँड शेअर्स अँडव्हाझर्स'...

बाबासाहेब आंबेडकर एक उत्कृष्ट फलंदाजही होते..
बाबासाहेबांचा शालेय जीवनात मुम्बई ला आल्यावर सर्वात आवडता खेळ कोणता होता तर तो म्हणजे
"क्रिकेट" !!!
यात ते वरळी ,परळ, कोळीवाडा, सातरस्ता इ.भागातील इतर जातीच्या टीम्स ची मैच खेळत आणि स्वत: च्या टीम चे कॅप्टन असत. अनेक मैच ते जिंकत .बाबासाहेब एक चांगले फलंदाज (batsman) होते .त्यांना फलंदाजीतले बारकावे माहीत होते आणि ते आपल्या टीम मधील सहकार्याना समजावून सांगत...

असे हे हरहून्नरी बाबासाहेब...
बाबासाहेब समजायला वेळ लागतोय,
पण एकदा समजले कि त्यांच्याच विचारांचं वेड लागतय...
आणि विचारांचा घोळ होतं नाही...
अश्या या कलासक्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन...
- हर्षल जाधव, कोल्हापूर
9637351400

संदर्भ-
1) चांगदेव भवानराव खैरमोडे लिखित डॉ. भीमराव रामजी आंबेडकर खंड १ खंड 2

2) डॅा. बाबासाहेब आंबेडकर ( ' आठवणींतले बाबासाहेब ' लेखक योगीराज बागूल, ग्रंथाली प्रकाशन या पुस्तकातून. प्रकरण- मंतरलेले दिवस-न्यायमूर्ति भालचंद्र वराळे )

3) चित्रलेखा साप्ताहिक अंक 17 एप्रिल 2016..

Posted on by हर्षल जाधव | No comments

शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

मुलाला मुलीसारखं वाढवण्याचं धाडस कराल काय ?

''मी माझ्या मुलीला मुलासारखं वाढवलंय" असं छाती फुगवून सांगणारे बरेच जण भेटतात. " माझी मुलगी मला मुलासारखीच आहे" असं ते जेव्हा अभिमानानं सांगतात, तेव्हा प्रश्न पडतो की, ते आपल्या मुलाला मात्र मुलीसारखं वाढवत असतील का? पण तसं होत नाही. कारण पुरूष श्रेष्ठ असतो हे आपल्या मनात खोलवर रुजलेलं आहे.
म्हणून तर मग मुलींनी एकवेळ मुलांसारखं असलेलं आपल्याला चालतं. मग ते मुलांसारखं कपडे घालणं, केस कापणं असो किंवा धाडस, कर्तबगारी दाखवणं असो.(कर्तबगार असणं आजही पुरूषीपणाचं लक्षण आहे.)
पण हेच जर मुलगा समाजाच्या व्याख्येनुसार मुलीसारखा असेल, तर त्याचा स्वीकार होतो का? म्हणजे जर मुलगा संवेदनशील असेल, त्याला स्वैयंपाक करण्यात रस असेल, तो हळवा असेल, तर पालकांना हे चालतं का? तर नाही. त्याला बायल्या म्हणून चिडवतात. त्याला मर्द बनण्याचे, कणखर वागण्याचे डोस दिले जातात.
समानता मानणारे किती पालक आपल्या मुलाला स्वयंपाकघरात घेऊन जातात, घर सांभाळणं ही दोघांची जबाबदारी असते हे शिकवतात? खरं माणूसपण हे स्त्रीचा एक माणूस म्हणून आदर करण्यात आहे, हे सांगतात? याचा आज विचार करण्याची गरज आहे.
खऱ्या अर्थाने समानता आणण्यासाठी जेवढं मुलींना कणखर आणि सक्षम बनवण्याची गरज आहे तेवढंच मुलांना संवेदनशील बनवण्याची गरज आहे.

Posted on by हर्षल जाधव | 1 comment

सोमवार, ३ एप्रिल, २०१७

समाजस्वास्थ्य’ च्या निमीत्ताने....

काल अजित दळवी लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘समाजस्वास्थ्य’ हे संततीनियमनाबद्दल बोलणाऱ्या र. धों. कर्वे यांच्या कार्याचा वेध घेणारं नाटक माझ्या कोल्हापूर टीम सोबत पाहिलं.
रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या लोकविलक्षण जीवनकार्यावर आधारीत एक उत्कृष्ट नाटक !
गिरिश कुलकर्णी यांचा सर्वांगसुंदर अभिनय- अतुल पेठे यांच सशक्त दिग्दर्शन.
आणि...पत्नी मालतीबाईंच्या भूमिकेत राजश्री सावंत-वाड मामा वरेरकर - अभय जबडे ; डॉ. आंबेडकर - अजित साबळे. अहिताग्नी राजवाडे झालेले रणजीत मोहिते आणि शेटे वकिलाच्या भूमिकेतले कृतार्थ शेगांवकरही छाप पाडून गेले.
सारेच कलाकार उत्कृष्ट, बरं का!
पण सर्वात महत्वाचा भाग म्हणजे रधों कर्व्यांचे विचारप्रवर्तक आयुष्य!
कुटुंब नियोजन अथवा संतती नियमनाचा भारतातील आद्य प्रवर्तक - र. धों.!
स्वातंत्र्य पूर्व काळातील कर्मठ सनातनी समाज आणि या समाजाला लैंगिकता, स्त्री-पुरुष संबंध, व्यभिचार या विषयांवर लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या, संततिनियमनाचा प्रसार स्वतःच्या घरापासून करणाऱ्या, त्याविषयी विविध प्रयोग करणाऱ्या रघुनाथ धोंडो कर्वे या द्रष्ट्या माणसावर अश्लिलतेचा आरोप ठेवून गुदरलेल्या तीन खटल्यांची प्रकरणं म्हणजे हे नाटक...
र.धो....१९२०-५० काळातील युगप्रवर्तक पण तात्कालीन राजकारणामुळे कुजलेल्या अनेक महानुभावांपैकी एक!
या नाटकात सनातनी - कर्मठ हिंदू समाज, स्त्रियांचे लैगिक स्वातंत्र्य, लैगिक अंधश्रद्धा यांच्यावर प्रहार करणार्‍या एक युगद्रष्ट्याची झालेली ससेहोलपट अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. नतद्रष्ट समाजाने गुणीजनांची किती आणि कशी अवहेलना केली त्याचे ज्वलंत उदाहरण...
र. धों.चे सर्व क्रांतिकारी विचार अजून समाजात रुजलेले नाहीत. पण कुटुंब नियोजन, लैंगिक शिक्षण हे शब्दही ज्या समाजात वज्र्य होते, तिथे या संकल्पना स्वीकारार्ह बनवण्यात त्यांच्या जीवनकार्याचे निश्चितच योगदान आहे हे नाटक पाहत असताना लक्षात येते.
र. धों.ची मते सर्वमान्य झाली नसतील; पण त्यावर समाजात चर्चा झाली, विचारमंथन झाले, हीही गोष्ट महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनेच ज्ञाननिर्मिती होते आणि नवे विचार मूळ धरू शकतात. शिवाय ‘समाजस्वास्थ्य’च्या त्यावेळच्या नियमित वाचकांच्या सार्वजनिक व्यवहारात नाही, तरी व्यक्तिगत जीवनात या नव्या आणि वेगळय़ा विचारांचे काही ना काही सकारात्मक प्रतििबब कसं पडत गेले हे ही या नाटकाच्या माध्यमातून कळत जाते.
आज १२५ + कोटींनंतर देशात निर्माण झालेल्या प्रचंड अराजकता आणि र.धों.नी काळाचा वेध घेऊन तेंव्हाच केलेले प्रयत्न आज नाटक पाहताना कमालीचे वाटतात..
उत्कृष्ट रंगमंच ; प्रकाश योजना ; भाषाशैली ; संवाद सातत्य यामुळे १०० वर्षा पूर्वीचा काळ प्रेक्षकांसमोर मांडण्यात सर्व टीम पूर्णपणे यशस्वी ठरली आहे.
ज्यांना र.धों. कर्वे (महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सुपुत्र) यांच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल त्यांसाठी केवळ अचौक्य! (न चुकवण्यासारख) असं हे नाटक आहे.
नक्की पहा...*समाजस्वास्थ्य*
दिनांक 01/04/2017

Posted on by हर्षल जाधव | No comments

सोमवार, २३ जानेवारी, २०१७

पहिल्या प्रेमाला न्याय देणारा सिनेमा...ती सध्या काय करतेय...!!! - हर्षल जाधव



पहिल्या प्रेमाला न्याय देणारा सिनेमा...ती सध्या काय करतेय.

मराठी चित्रपट सृष्टीतील मागील दोन वर्षाचे सिंहावलोकन करायचे झाल्यास त्यामध्ये पौगंडावस्तेपासून ते कॉलेज जीवनातील प्रेमावर अनेक चित्रपट आले. गाजले देखील. प्रेक्षकांच्या आवडीचा असा शेवट काही चित्रपटांच्या कथानकांनी घडवुन आणला तर कांही कथानक समाजाचं भीषण वास्तव दाखवून विचार करायला उन्मूक्त करूनही गेल्या.

सतीश राजवाडे यांची कथा आणि दिग्दर्शित 'ती सध्या काय करतेय' हे नावच अनेक पूर्वग्रह घेवुनच कथानक सुरू करते. एकमेकांवर प्रेम असणाऱ्या प्रत्येक जोडप्याचं लग्न होईलच अशी शाश्वती नसणार्या आपल्या समाजात अनेकांनाच ती सध्या काय करतेय ? हा प्रश्न भेडसावत असतो.काही जण तो प्रश्न मनाच्या कप्यात कुलुप लावून कायमचा बंद करण्याचा खटाटोप करतात तर काहीजण वस्तूस्तितीला सामोरे जात ह्या प्रश्नाला प्रसन्न मनाने तर कधी प्रचंड दडपणाने सामोरे जातात व उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात..

या चित्रपटाचा नायक अनुराग (लहानपणचा हृदीत्य राजवाडे, पौगंडावस्थेतला अभिनव बेर्डे, मोठेपणीचा अंकुश चौधरी) आपल्या पहिल्या प्रेमाच्या शोधात सिनेमाच्या पहिल्या काही क्षणांमध्ये दाखवला आहे. प्रथम  त्याच्याच चाळीमध्ये आणि नंतर अनुराग च्या आयुष्यात एंट्री करते सिनेमाची नायिका तन्वी.(लहानपणीची निर्मोही अग्निहोत्री , पौगंडावस्थेतले आर्या आंबेकर , मोठेपणीची  तेजश्री प्रधान ) अनुरागचं पहिलं प्रेम. दोघेही लहानपणापासून एकत्र असल्यामुळे एकमेकांना मदत करने एकत्र खेळणे शाळेला ; कॉलेजला हि एकत्र जाणे यातूनच त्यांच्यात प्रेमाचा हा अंकुर फुटलेला असतो.पण हे नातं व्यक्त करायला दोघांनाहि कमी अधिक प्रमाणात शक्य होत नाही आणि समज - गैरसमजातून त्यांची कॉलेजच्या निरोप समारंभात ताटातुट होते ; ती कायमचीचं !

आपलं पहिलं प्रेम नेमकं कोणतं असा प्रश्न डोक्यात घेवुन फिरणार्या अनुराग ला थोड्या वेळाने का असेना उत्तर सापडतच पण याच काळात कॉलेज जीवनात अनुराग जेंव्हा प्रवेश करतो ; आसपासची हिरवळ पाहून त्याच्याहि मनात ' मन में लड्डू फूटा ' अशी फिलिंग निर्माण होते. या फूलावरून त्या फुलावर असं चंचल मनाचं फुलपाखरू घुटमळत असतं. मोहिनी ; अंजली असा प्रवास करून त्याचं मन अखेर तन्वीसाठीच व्यक्त व्हायचं असा निश्चय करून जातो पण पव्या सोबत घेतलेली ड्रिंक त्याचे मनसुबे उधळून लावते आणि तन्वी कायमचीच निघून जाते.

नंतर च्या काळात दोघेही आपापल्या आयुष्यात वेल सेट्ल होतात. पव्याने आयोजित केलेल्या गेट टुगेदर पार्टीला पुर्वीचे फोटो पाहत असताना एका मैत्रिणीने विचारलेला प्रश्न त्याला भलताच आतून हादरून सोडतो ' ती काय करते रे सध्या ? ' या प्रश्नाने तो तात्काळ भांबावतो. पार्टीला सर्व मित्र मैत्रिणी आलेले असताना तन्वी का आली नाही ; हा एकच प्रश्न त्याला सतावतो अखेर पव्याच तन्वीच्या संपर्कात येवून ' ती परत आली आहे ' अशी धक्कादायक पण तूर्तास आनंद देणारी बातमी तो देतो व पहिल्या प्रेमाचा दुसरा डाव येथून सुरू होतो.

पहिल्या अधुर्या डावात व्हिलन ठरलेला पव्या या दूसऱ्या डावातहि व्हिलनच ठरतो.तन्वीला भेटायला गेलेल्या अनुराग ला पव्या नेमका तन्वीला पाहतानाच फोन करतो ईतक्यात तन्वी निघून जाते.नंतर च्या काळात दोघांची पुन्हा पुन्हा भेट दाखवली आहे. अव्यक्त शब्दांना वाट मोकळी करून देण्यासाठी दोघीही वाट पाहत असतात अखेर त्याच जुन्या चाळीत दोघांची भेट दाखवली आहे.त्याने जपून ठेवलेली व तिला देता न आलेली अंगठी अखेर तिला तो देतो पण ती अंगठी तिच्या कोणत्याचं बोटात बरोबर बसत नाही म्हणून शेवटी अंगठ्यामध्ये त्या अंगठीला जागा देते.यावेळी दोघेही भरभरून बोलतात.अव्यक्त प्रेमाचा पाझर दोघांच्याहि डोळ्यांतून ओसंडून वाहतो. ईतके दिवस अनुभवलेला विरह व्यक्त करताना तन्वी यापुढे मी तुझ्या कायमच संपर्कात राहीन आणि आज जर मी व्यक्त झाले नसते तर एवढ्या चांगल्या मित्राला गमावून बसले असते असं स्पष्ट सांगते.
ईतक्या वर्षानंतरहि आपल्या आठवणींना ताज करण्याचा दोघेही प्रयत्न करतात.
लहानपणी मनाने दिलेला कौल आणि त्याच दिवसांच्या काळात वयात आलेले प्रेम आणि आता याच प्रेमाला सामंजस्यपणाची लकेर दिग्दर्शकाने उत्तमरित्या साकारली आहे.आपले पहिले प्रेम लग्नाच्या स्वरूपात आपल्याला गवसले नसले म्हणून काय झाले सध्या आपण तसेच पुर्वीसारखे एकमेकांचे सच्चे मित्र म्हणून राहू हा सकारात्मक संदेश चित्रपटाचा हेतु साध्य करतो.खर्या प्रेमाला दिग्दर्शकाने दिलेला हा न्याय वाटतो.

जिव्हाळ्याचा विषय ; साधे ; सोप्पे ; सरळ पुढे जाणारे कथानक ; संवादांची उत्तम मांडणी आणि सिनेमात वेळोवेळी प्रसंगाला अनुसरून येणारी गाणीहि मस्त आहेत. हृदयात वाजे समथिग ; परिकथा ; जराजरा ; कितीदा नव्याने हि गाणी कथानकात मिसळून गेली आहेत.सर्वच कलाकारांची सुरेख साथ सिनेमाला लाभली आहे.एकंदरीत हा  सिनेमा पाहणाऱ्या प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण नक्कीच करूjन देतो आणि ' ती सध्या काय करतेय ' किंवा ' तो सध्या काय करतोय ' असा प्रश्न मनात घोंगावत घेवुन प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडतो.

सोमवार, ९ जानेवारी, २०१७

ती सध्या काय करतेय...!

*ती सध्या काय करतेय...!!*

आई वडिलांच्या अब्रूसाठी स्वतःच्या प्रेमाचा गळा घोटतेय ;
भावकीच्या सन्मानासाठी पुन:पुन्हा जातीसाठीच माती खातेय...

संसाराच्या रहाट गाडग्यात स्वतःला ती आता कोंबून घेतेय ;
त्याच्या सोबतच्या आठवणीतच आता ती जगते म्हणतेय...

कधी कधी भावुक होवून फोनवर त्याच्याशी बोलताना चार अश्रु ढाळतेय ;
शरीराने एकत्र नसलो म्हणून काय झालं ;
मनानं मात्र नेहमीच सोबत असतोय..!
असा भाव मनात मात्र ती नेहमीच जपतेय..

नवराही म्हणे  तिचा *"सध्या ती काय करतेय"* या प्रश्नाला जरा जास्तच भिड़तोय ;
संधी भेटेल तसं जुन्या प्रेमाचा गुलकंद तो हि चाखतोय...

हि मात्र भेदभाव न करता जेवढं प्रेम *त्याच्यावर* करतेय तेवढचं प्रेम *नवऱ्यावरही* करतेय..
परंपरावादी संसाराच्या तारेवरची हि कसरत ती लिलया पूर्ण करतेेय..

अंधार पडला की पत्नी म्हणून रात्र कर्तव्य ती निमुटपणे पार पाडतेय ;
कधी कधी ईच्छे विरुध्द वापरली तरी बलात्कारी म्हणून नवऱ्याला मनातल्या मनातचं नाड़तेय..

जग हि आता तिच्या साठी काहीच करत नाही ;
आपल्या त्या पिनल कोड मध्येहि याला काहीच शिक्षा नाही..
म्हणून

नैतिक अनैतिक च्या भंपक विचाराला ती फाट्यावर मारतेय...
आपल्या *प्रियकराची प्रेमळ प्रेयसी* आणि *नवऱ्याचीही पतिव्रता पत्नी*
अश्या दोन्ही भूमिका ती उत्तम प्रकारे बजावतेय...

*ती सध्या एवढंच करतेय...*
*ती सध्या एवढंच करतेय...*

- _हर्षल जाधव ; कोल्हापूर 9637351400_

Posted on by हर्षल जाधव | No comments

शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

नगर परिषद निवडणुकीतील अनुभव

नगरपरिषद निवडणुकीची ड्यूटी मुस्लिम धर्मीय मोठ्या प्रमाणात असणाऱ्या वाडॉत लागली होती...सहकारी असलेल्या दूसर्या मास्तरीनं बाईनी "तिथं सगळी त्यांचीचं लोक असतात" असा सूर आळवत आपली नाराजी अगोदरचं व्यक्त केली...

निवडणुक अधिकारी म्हणून काम पाहण्याचा ही माझी पहीलीच वेळ त्यामुळे उत्सुकता आणि भिती अशी संमिश्र मानसिक स्थिती होती...
*मुळात कोणतेही काम करत असताना त्या बाबतीत दूषित पूर्वग्रह न ठेवता काम करायची सवय असल्याने येथेही मला त्याची मदतच झाली..*

बुरखा घातलेल्या अनेक महिला आपल्या मतदानाचा हक्क बजावायला येत होत्या...आता ओळख पटवून घेण्या साठी आम्हाला तो बुरखा बाजूला घ्या असं म्हटल्याशिवाय गत्यतर नव्हतं. आधीच मुळातच प्रचंड अशी धार्मिक कट्टरता घेवुन आयुष्य कंठणार्या या महिला वर्गाला एका बाह्य पुरुषाने तेही परधर्मीय व्यक्तीने असं हे धर्मभ्रष्ट (?) क्रूत्य करायला सांगणे तसं जिकिरीचेचं काम पण मला येथे सांगताना आनंद होतोय की या ओळख पटवन्यासाठीच्या कार्यात त्या सर्वच स्त्रीयांनी सहकार्य केले...बूर्खा घालून आलेल्यां पैकी काही स्त्रियाँ स्वतः मतदान केंद्रात आल्यावर बुरखा डोक्यावर घेत होत्या तर काही स्त्रियांना तिथे उपस्थित उमेदवारांचे प्रतिनिधि बुरखा बाजूला करण्यास सांगत होते...व त्या निसंकोच बूर्खा बाजूला सारत होत्या...
थोडक्यात काय तर
*जी राज्यघटना ईथल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचे पालन करण्याचा हक्क देते तीच घटना जेंव्हा मतदानासारखे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याची वेळ येते तेंव्हा धार्मिक बाबींना घरातचं ठेवा असा ईशारा देवून माणूस म्हणून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा असा संदेशहि देते...*

याच प्रसंगी मतदान प्रक्रियेविषयी असणारी सामान्य व्यक्तींची निरक्षरताहि मला जवळून पहायला मिळाली...
*स्वातंत्र्याची 65 वर्षे घसरुनहि ईथे कोणत्याचं ईयत्तेत मतदान कसं करायचं असतं या प्रक्रियेविषयी शिकवलं जात नाही हि जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या देशाची शोकांतिकाचं आहे...*

असं असूनही आपल्या मतदानाच्या हक्काची जाणीव असणारे तर काही आपण मतदान नाही केले तर आपल्या नावावर ज्या सरकारी योजना सुरू आहेत त्या बंद होतील या भीतीने तर काही लोक थोड्याश्या पैश्यासाठी विकले गेलेले असा संमिश्र जनसमूह मतदान प्रक्रिया पार पाडताना दिसून आला..
बाकी सद्रुढ लोकशाही निर्मितीसाठी मतदारांची साक्षरता हा मुद्दा आमच्या शिक्षण व्यवस्थे चालवणार्याच्या  जेंव्हा लक्षात येईल तो दिन सोनियाचा !

- *हर्षल जाधव*
9637351400
दिनांक :- 2 डिसेंबर 2016

Posted on by हर्षल जाधव | No comments