शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

एस.टी बस मध्ये वाढदिवसाची मला मिळाली भन्नाट भेट..

काल माझ्या वाढदिवसानिमित्य आपण शुभेच्छांचा जो पाऊस पाडलात त्यात मी पूर्णपणे न्हाऊन गेलो आहे. प्रत्यक्ष call करून, फेसबुक,
whats app वरून आणि शक्य त्या सर्व माध्यमातून मला तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपला ऋणी आहे...

काल मला एस.टी बस मध्ये वाढदिवसाची एक भन्नाट भेट मिळाली.
काल मी रत्नागिरी ते कोल्हापूर एस.टी बसने प्रवास करत होतो. प्रवाश्यांनी गाडी बरीच भरली होती. एस.टी चे निरीक्षण केल्यावर मला जाणवलं की आत मध्ये प्रत्येक खिडकीला एकसारखं दिसणारे एक स्टिकर लावलं आहे.

काय होतं हे स्टिकर तर भूत, भानामती, करणी, love प्रॉब्लेम, नोकरीत समस्या यांवर हमखास उपाय सुचवणार्या भोंदुबाबांच्या धंद्याची जाहिरात... गेल्या अनेक महिन्यापासून मी जेंव्हा जेंव्हा एस.टी ने प्रवास करतो तेंव्हा शक्य होईल तेवढी ही स्टिकर काढण्याचा प्रयत्न करतो...लोकांनी या भोंदुबाबांकडे जावून त्यांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण होऊ नये हाच हेतु.

आज त्या एस.टी मध्ये खूपच स्टिकर मला दिसली. बहुतेक काही दिवसांपूर्वीच ती नव्याने लावली गेली असावीत. आता पर्यत हे स्टिकर पाहून किती लोकं लुबाडली गेली असतील आणि किती पुढे लुबाडली जातील हे सांगता येत नाही म्हणून मोठ्या धीराने मी प्रवाश्यांच्या समोर उभा राहिलो आणि त्या स्टिकरमधील मजकूर काय आहे आपण या भोंदुबाबांकडून कसे लुबाडले जातो याविषयी माहिती सांगितली. लुबाडणुक झाल्याचे लक्षात आल्यावर स्वत: च्या अब्रु साठी पोलीसांना देखील कळवत नाही म्हणून असली स्टिकर मी अनेक वेळा शक्य होईल तसे स्वत हून काढतो असं सांगून आज मात्र हे काम तुम्ही करायला हवं असं सांगितलं कारणही तसंच होतं आज माझा वाढदिवस आहे आणि तुमच्या शुभेच्छा सोबत जर हे अंधश्रध्दा कमी करायला मदत करणारे आणि आपले सामाजिक भान जपणार काम तुम्ही केले तर मला बरं वाटेल. माझ्या वाढदिना दिवशी हे तुमच्याकडून गिफ्ट मला मिळाली असं समजेन, अशी भावनिक साद घातली आणि काय आश्चर्य पटापट सगळे प्रवासी आपाआपल्या खिडकीच्या काचेवर चिकटलेले स्टिकर काढू लागली आणि अगदी काही मिनिटांत सगळ्या काचांनी मोकळा श्वास घेतला आणि अश्या प्रकारे मला माझ्या वाढदिवसाचे कृतिशील असं गिफ्ट मिळाले..😊

या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणांसहि मी विनंती करू ईच्छितो की, आपण देखील एस.टी ने प्रवास करत असताना आपणांस अशी भोंदुगिरी वाढवणारी स्टिकर दिसल्यास काही वेळ देवून ती काढून टाकण्याच्या माझ्या मोहिमेत सहभागी व्हा...आपल्या या छोट्या - छोट्या कृती आपला समाज अंधश्रद्धा मुक्त होण्यास मदत करेल...

पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे प्रेम,शुभेच्छा,आशीर्वाद यांसाठी शतशः आभार..असाच ऋणानुबंध कायम रहावा हि सदिच्छा..सर्वांचे आभार..😊

धन्यवाद.
25/08/2017

Posted on by हर्षल जाधव | 1 comment

1 टिप्पणी: