सोमवार, २३ जानेवारी, २०१७

पहिल्या प्रेमाला न्याय देणारा सिनेमा...ती सध्या काय करतेय...!!! - हर्षल जाधव



पहिल्या प्रेमाला न्याय देणारा सिनेमा...ती सध्या काय करतेय.

मराठी चित्रपट सृष्टीतील मागील दोन वर्षाचे सिंहावलोकन करायचे झाल्यास त्यामध्ये पौगंडावस्तेपासून ते कॉलेज जीवनातील प्रेमावर अनेक चित्रपट आले. गाजले देखील. प्रेक्षकांच्या आवडीचा असा शेवट काही चित्रपटांच्या कथानकांनी घडवुन आणला तर कांही कथानक समाजाचं भीषण वास्तव दाखवून विचार करायला उन्मूक्त करूनही गेल्या.

सतीश राजवाडे यांची कथा आणि दिग्दर्शित 'ती सध्या काय करतेय' हे नावच अनेक पूर्वग्रह घेवुनच कथानक सुरू करते. एकमेकांवर प्रेम असणाऱ्या प्रत्येक जोडप्याचं लग्न होईलच अशी शाश्वती नसणार्या आपल्या समाजात अनेकांनाच ती सध्या काय करतेय ? हा प्रश्न भेडसावत असतो.काही जण तो प्रश्न मनाच्या कप्यात कुलुप लावून कायमचा बंद करण्याचा खटाटोप करतात तर काहीजण वस्तूस्तितीला सामोरे जात ह्या प्रश्नाला प्रसन्न मनाने तर कधी प्रचंड दडपणाने सामोरे जातात व उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात..

या चित्रपटाचा नायक अनुराग (लहानपणचा हृदीत्य राजवाडे, पौगंडावस्थेतला अभिनव बेर्डे, मोठेपणीचा अंकुश चौधरी) आपल्या पहिल्या प्रेमाच्या शोधात सिनेमाच्या पहिल्या काही क्षणांमध्ये दाखवला आहे. प्रथम  त्याच्याच चाळीमध्ये आणि नंतर अनुराग च्या आयुष्यात एंट्री करते सिनेमाची नायिका तन्वी.(लहानपणीची निर्मोही अग्निहोत्री , पौगंडावस्थेतले आर्या आंबेकर , मोठेपणीची  तेजश्री प्रधान ) अनुरागचं पहिलं प्रेम. दोघेही लहानपणापासून एकत्र असल्यामुळे एकमेकांना मदत करने एकत्र खेळणे शाळेला ; कॉलेजला हि एकत्र जाणे यातूनच त्यांच्यात प्रेमाचा हा अंकुर फुटलेला असतो.पण हे नातं व्यक्त करायला दोघांनाहि कमी अधिक प्रमाणात शक्य होत नाही आणि समज - गैरसमजातून त्यांची कॉलेजच्या निरोप समारंभात ताटातुट होते ; ती कायमचीचं !

आपलं पहिलं प्रेम नेमकं कोणतं असा प्रश्न डोक्यात घेवुन फिरणार्या अनुराग ला थोड्या वेळाने का असेना उत्तर सापडतच पण याच काळात कॉलेज जीवनात अनुराग जेंव्हा प्रवेश करतो ; आसपासची हिरवळ पाहून त्याच्याहि मनात ' मन में लड्डू फूटा ' अशी फिलिंग निर्माण होते. या फूलावरून त्या फुलावर असं चंचल मनाचं फुलपाखरू घुटमळत असतं. मोहिनी ; अंजली असा प्रवास करून त्याचं मन अखेर तन्वीसाठीच व्यक्त व्हायचं असा निश्चय करून जातो पण पव्या सोबत घेतलेली ड्रिंक त्याचे मनसुबे उधळून लावते आणि तन्वी कायमचीच निघून जाते.

नंतर च्या काळात दोघेही आपापल्या आयुष्यात वेल सेट्ल होतात. पव्याने आयोजित केलेल्या गेट टुगेदर पार्टीला पुर्वीचे फोटो पाहत असताना एका मैत्रिणीने विचारलेला प्रश्न त्याला भलताच आतून हादरून सोडतो ' ती काय करते रे सध्या ? ' या प्रश्नाने तो तात्काळ भांबावतो. पार्टीला सर्व मित्र मैत्रिणी आलेले असताना तन्वी का आली नाही ; हा एकच प्रश्न त्याला सतावतो अखेर पव्याच तन्वीच्या संपर्कात येवून ' ती परत आली आहे ' अशी धक्कादायक पण तूर्तास आनंद देणारी बातमी तो देतो व पहिल्या प्रेमाचा दुसरा डाव येथून सुरू होतो.

पहिल्या अधुर्या डावात व्हिलन ठरलेला पव्या या दूसऱ्या डावातहि व्हिलनच ठरतो.तन्वीला भेटायला गेलेल्या अनुराग ला पव्या नेमका तन्वीला पाहतानाच फोन करतो ईतक्यात तन्वी निघून जाते.नंतर च्या काळात दोघांची पुन्हा पुन्हा भेट दाखवली आहे. अव्यक्त शब्दांना वाट मोकळी करून देण्यासाठी दोघीही वाट पाहत असतात अखेर त्याच जुन्या चाळीत दोघांची भेट दाखवली आहे.त्याने जपून ठेवलेली व तिला देता न आलेली अंगठी अखेर तिला तो देतो पण ती अंगठी तिच्या कोणत्याचं बोटात बरोबर बसत नाही म्हणून शेवटी अंगठ्यामध्ये त्या अंगठीला जागा देते.यावेळी दोघेही भरभरून बोलतात.अव्यक्त प्रेमाचा पाझर दोघांच्याहि डोळ्यांतून ओसंडून वाहतो. ईतके दिवस अनुभवलेला विरह व्यक्त करताना तन्वी यापुढे मी तुझ्या कायमच संपर्कात राहीन आणि आज जर मी व्यक्त झाले नसते तर एवढ्या चांगल्या मित्राला गमावून बसले असते असं स्पष्ट सांगते.
ईतक्या वर्षानंतरहि आपल्या आठवणींना ताज करण्याचा दोघेही प्रयत्न करतात.
लहानपणी मनाने दिलेला कौल आणि त्याच दिवसांच्या काळात वयात आलेले प्रेम आणि आता याच प्रेमाला सामंजस्यपणाची लकेर दिग्दर्शकाने उत्तमरित्या साकारली आहे.आपले पहिले प्रेम लग्नाच्या स्वरूपात आपल्याला गवसले नसले म्हणून काय झाले सध्या आपण तसेच पुर्वीसारखे एकमेकांचे सच्चे मित्र म्हणून राहू हा सकारात्मक संदेश चित्रपटाचा हेतु साध्य करतो.खर्या प्रेमाला दिग्दर्शकाने दिलेला हा न्याय वाटतो.

जिव्हाळ्याचा विषय ; साधे ; सोप्पे ; सरळ पुढे जाणारे कथानक ; संवादांची उत्तम मांडणी आणि सिनेमात वेळोवेळी प्रसंगाला अनुसरून येणारी गाणीहि मस्त आहेत. हृदयात वाजे समथिग ; परिकथा ; जराजरा ; कितीदा नव्याने हि गाणी कथानकात मिसळून गेली आहेत.सर्वच कलाकारांची सुरेख साथ सिनेमाला लाभली आहे.एकंदरीत हा  सिनेमा पाहणाऱ्या प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण नक्कीच करूjन देतो आणि ' ती सध्या काय करतेय ' किंवा ' तो सध्या काय करतोय ' असा प्रश्न मनात घोंगावत घेवुन प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडतो.

सोमवार, ९ जानेवारी, २०१७

ती सध्या काय करतेय...!

*ती सध्या काय करतेय...!!*

आई वडिलांच्या अब्रूसाठी स्वतःच्या प्रेमाचा गळा घोटतेय ;
भावकीच्या सन्मानासाठी पुन:पुन्हा जातीसाठीच माती खातेय...

संसाराच्या रहाट गाडग्यात स्वतःला ती आता कोंबून घेतेय ;
त्याच्या सोबतच्या आठवणीतच आता ती जगते म्हणतेय...

कधी कधी भावुक होवून फोनवर त्याच्याशी बोलताना चार अश्रु ढाळतेय ;
शरीराने एकत्र नसलो म्हणून काय झालं ;
मनानं मात्र नेहमीच सोबत असतोय..!
असा भाव मनात मात्र ती नेहमीच जपतेय..

नवराही म्हणे  तिचा *"सध्या ती काय करतेय"* या प्रश्नाला जरा जास्तच भिड़तोय ;
संधी भेटेल तसं जुन्या प्रेमाचा गुलकंद तो हि चाखतोय...

हि मात्र भेदभाव न करता जेवढं प्रेम *त्याच्यावर* करतेय तेवढचं प्रेम *नवऱ्यावरही* करतेय..
परंपरावादी संसाराच्या तारेवरची हि कसरत ती लिलया पूर्ण करतेेय..

अंधार पडला की पत्नी म्हणून रात्र कर्तव्य ती निमुटपणे पार पाडतेय ;
कधी कधी ईच्छे विरुध्द वापरली तरी बलात्कारी म्हणून नवऱ्याला मनातल्या मनातचं नाड़तेय..

जग हि आता तिच्या साठी काहीच करत नाही ;
आपल्या त्या पिनल कोड मध्येहि याला काहीच शिक्षा नाही..
म्हणून

नैतिक अनैतिक च्या भंपक विचाराला ती फाट्यावर मारतेय...
आपल्या *प्रियकराची प्रेमळ प्रेयसी* आणि *नवऱ्याचीही पतिव्रता पत्नी*
अश्या दोन्ही भूमिका ती उत्तम प्रकारे बजावतेय...

*ती सध्या एवढंच करतेय...*
*ती सध्या एवढंच करतेय...*

- _हर्षल जाधव ; कोल्हापूर 9637351400_

Posted on by हर्षल जाधव | No comments