शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

मुलाला मुलीसारखं वाढवण्याचं धाडस कराल काय ?

''मी माझ्या मुलीला मुलासारखं वाढवलंय" असं छाती फुगवून सांगणारे बरेच जण भेटतात. " माझी मुलगी मला मुलासारखीच आहे" असं ते जेव्हा अभिमानानं सांगतात, तेव्हा प्रश्न पडतो की, ते आपल्या मुलाला मात्र मुलीसारखं वाढवत असतील का? पण तसं होत नाही. कारण पुरूष श्रेष्ठ असतो हे आपल्या मनात खोलवर रुजलेलं आहे.
म्हणून तर मग मुलींनी एकवेळ मुलांसारखं असलेलं आपल्याला चालतं. मग ते मुलांसारखं कपडे घालणं, केस कापणं असो किंवा धाडस, कर्तबगारी दाखवणं असो.(कर्तबगार असणं आजही पुरूषीपणाचं लक्षण आहे.)
पण हेच जर मुलगा समाजाच्या व्याख्येनुसार मुलीसारखा असेल, तर त्याचा स्वीकार होतो का? म्हणजे जर मुलगा संवेदनशील असेल, त्याला स्वैयंपाक करण्यात रस असेल, तो हळवा असेल, तर पालकांना हे चालतं का? तर नाही. त्याला बायल्या म्हणून चिडवतात. त्याला मर्द बनण्याचे, कणखर वागण्याचे डोस दिले जातात.
समानता मानणारे किती पालक आपल्या मुलाला स्वयंपाकघरात घेऊन जातात, घर सांभाळणं ही दोघांची जबाबदारी असते हे शिकवतात? खरं माणूसपण हे स्त्रीचा एक माणूस म्हणून आदर करण्यात आहे, हे सांगतात? याचा आज विचार करण्याची गरज आहे.
खऱ्या अर्थाने समानता आणण्यासाठी जेवढं मुलींना कणखर आणि सक्षम बनवण्याची गरज आहे तेवढंच मुलांना संवेदनशील बनवण्याची गरज आहे.

Posted on by हर्षल जाधव | 1 comment

1 टिप्पणी: