रविवार, २६ जानेवारी, २०२०

आजचा प्रजासत्ताक दिन अन उतारा...- हर्षल जाधव सर

प्रजासत्ताक दिन आणि अंधश्रध्देमुळे झालेले दीन...

२६ जानेवारी १९५० ला या देशाला स्वतः ची अशी घटना मिळाली. जी घटना देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या हक्काचे सुंदर आयुष्य जगायला मदत करेल. राज्यघटना आपल्याला भारतीय नागरिक म्हणून आपले आयुष्य शांतता व समानतेने व्यतीत करण्याचे नागरी अधिकार प्रदान करते. या मुलभूत हक्कांमध्ये कायद्यापुढे समानता, उच्चार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने कोठेही उपस्थित राहण्याचे व सभा स्वातंत्र्य, आणि नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी संवैधानिक प्रतिकारासाठी habeas corpus यासारख्या याचिकांचा अधिकार देखील हक्क म्हणून दिला आहे. 
या अधिकारांचा भंग केल्यास न्यायालयाच्या विवेकानुसार भारतीय दंडविधान संहितेखाली शिक्षा होऊ शकते.
जसे हक्क महत्वाचे आहेत तसे कर्तव्य देखील महत्वाची आहेतच ना..
 जसे भारतीय नागरिकांना हक्क दिले आहेत तशी काही कर्तव्य देखील दिली आहेत त्यातीलच एक म्हणजे, ‘इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायिन्टिफिक टेम्परामेंट्स, स्पिरिट ऑफ इनक्वायरी अॅन्ड ह्युमनिझम’. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुध्दी, मानवतावाद याचा विचारप्रसार आणि अंगिकार करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं घटनादत्त कर्तव्य आहे
 हे कर्तव्य ठळक करण्याचे कारण म्हणजे आजच देशाचा ७१ वा प्रजासत्ताक दिन शाळेत साजरा करून येत असताना एका ओढ्याच्या बाजूला हा उतारा ठेवला होता..उतारा ज्या परडीत ठेवला होता ती इतकी आकर्षक होती की तिला पाहताच  आम्ही गाडी थांबवली. मी आणि विनोद ने परडी मध्ये  कोणकोणत्या गोष्टी आहेत ह्या पहिल्यादा पहिल्या. त्यात ६-७ लिंबू, काळे कापड, खाऊची पाने, काजळ डबी, कापून ठेवलेला कांदा अस बरच साहित्य होत. हे सगळं साहित्य कालांतराने वायाच जाणार होते म्हणून त्यातील आम्हाला उपयुक्त असणारे साहित्य आम्ही घेतले आणि आमचा पुढील प्रवास पुन्हा सुरू झाला. 

हे सगळं एवढ्यासाठी लिहितोय कारण राज्यघटना अंमलात येऊन तब्बल ७१ वर्षे उलटून देखील ही उतारा ठेवण्याची आमची अंधश्रद्धा काही कमी झालेली नाही. प्रत्येक गावच्या तिकटी वर आणि ओढा, नदी, विहीर, जुना पडका वाडा ह्या ठिकाणी भूत, पिशाच्च, चेटकीण यांच्या भीतीने हा उतारा ठेवलाच जातो. 

एका बाजूला पोटाला महत्वाचे अन्न घटक न मिळाल्याने कुपोषणाने बालक मरणाऱ्या देशात असल्या अंधश्रध्देला बळी पडून स्वतःच्या हातानेच स्वतः चे व कुटूंबाचे आर्थिक, मानसिक शोषण करून आणि त्याच हाताने देशाच्या राष्ट्रध्वजाला वंदना देखील केल जाते हा केवढा मोठा विरोधाभास आहे. 

देशाचे जबाबदार नागरिक म्हणून संविधानातील या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करणे हे कर्तव्य आपण बजावायलाच हवं. जेंव्हा ही सर्व कर्तव्य आपण शक्य तेवढी नीट पार पाडू तेंव्हाच आपल्याला या देशाचा सुजाण नागरिक म्हणवून घेण्याला अर्थ आहे. 

संविधान आणि त्यांच्यातील हक्क आणि कर्तव्य ही आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग होणे हेच या प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे खरे प्रयोजन असायला हवं..

निदान या प्रजासत्ताक दिनापासून तरी असे उतारे कोणी ठेऊच नयेत याबद्दल समाजात जाऊन प्रबोधन करणे आणि असे उतारे दिसलेच तर न घाबरता, मनात कोणतीही भीती किंवा संकोच न बाळगता त्यातील उपयुक्त साहित्य सर्वांसमक्ष उचलून लोकांच्या मनातील भीती काढून टाकूयात..
भीतीमुक्त, अंधश्रद्धा मुक्त समाज घडवण्यासाठी उभे राहुयात हीच या प्रजासत्ताक दिनी ध्वजाला केलेली कृतीयुक्त मानवंदना असेल...

विवेकाचा आवाज बुलंद करूयात...
- हर्षल जाधव सर, कसबा तारळे 
9637351400