गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

कलासक्त बाबासाहेब...

#उत्तम तबलावादक #व्हायोलीनवादक #दिग्दर्शक #शिल्पकार #क्रिकेटपट्टू

बाबासाहेबांना विविध कलांची उत्तम जान होती...

ते वयाच्या बारा - तेराव्या वर्ष उत्तम तबला वाजवत..स्थानिक भजनीमंडळात आपल्या तबला वादनाची चुणुक ते वेळोवेळी दाखवत...
एकदा गल्लीतल्या भजनाच्या कार्यक्रमाला तबला वाजवणारा माणूस आला नाही त्यावेळी स्वतः डॉ.आंबेडकर यांनी खूप छान तबला वाजवला, त्यावेळी लोकांनी तोंडात बोटे घातली.

आवड म्हणुन ते व्हायोलिन सुध्दा शिकले होते...
"किंग लियर" या नाटकाचा "शहानी मुलगी" नावाने मराठी अनुवाद करुन त्याचं फ़क्कड प्रहसन त्यांनी सादर केलं होतं..
देवलांच्या "संगीत शारदा" या नाटकाचं बाबासाहेबांनी दिग्दर्शनही केलं होतं...

शेलींगकर गुरुजींकडून ते चित्रकला शिकले आणि मडिलगेकर उर्फ बापू यांच्याकडून शिल्पकलेचं मिळवलं होतं..त्यांनीच डोळे उघडे असलेले गौतम बुध्द घडवले...

स्टॉक मार्केट च्या एकुण कारभारात बाबासाहेबांना विशेष रस होता. त्यासाठी त्यानी स्वताची कंपनी देखिल सुरु केली होती कंपनीचं नाव होतं..
'स्टॉक्स अँड शेअर्स अँडव्हाझर्स'...

बाबासाहेब आंबेडकर एक उत्कृष्ट फलंदाजही होते..
बाबासाहेबांचा शालेय जीवनात मुम्बई ला आल्यावर सर्वात आवडता खेळ कोणता होता तर तो म्हणजे
"क्रिकेट" !!!
यात ते वरळी ,परळ, कोळीवाडा, सातरस्ता इ.भागातील इतर जातीच्या टीम्स ची मैच खेळत आणि स्वत: च्या टीम चे कॅप्टन असत. अनेक मैच ते जिंकत .बाबासाहेब एक चांगले फलंदाज (batsman) होते .त्यांना फलंदाजीतले बारकावे माहीत होते आणि ते आपल्या टीम मधील सहकार्याना समजावून सांगत...

असे हे हरहून्नरी बाबासाहेब...
बाबासाहेब समजायला वेळ लागतोय,
पण एकदा समजले कि त्यांच्याच विचारांचं वेड लागतय...
आणि विचारांचा घोळ होतं नाही...
अश्या या कलासक्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन...
- हर्षल जाधव, कोल्हापूर
9637351400

संदर्भ-
1) चांगदेव भवानराव खैरमोडे लिखित डॉ. भीमराव रामजी आंबेडकर खंड १ खंड 2

2) डॅा. बाबासाहेब आंबेडकर ( ' आठवणींतले बाबासाहेब ' लेखक योगीराज बागूल, ग्रंथाली प्रकाशन या पुस्तकातून. प्रकरण- मंतरलेले दिवस-न्यायमूर्ति भालचंद्र वराळे )

3) चित्रलेखा साप्ताहिक अंक 17 एप्रिल 2016..

Posted on by हर्षल जाधव | No comments

शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

मुलाला मुलीसारखं वाढवण्याचं धाडस कराल काय ?

''मी माझ्या मुलीला मुलासारखं वाढवलंय" असं छाती फुगवून सांगणारे बरेच जण भेटतात. " माझी मुलगी मला मुलासारखीच आहे" असं ते जेव्हा अभिमानानं सांगतात, तेव्हा प्रश्न पडतो की, ते आपल्या मुलाला मात्र मुलीसारखं वाढवत असतील का? पण तसं होत नाही. कारण पुरूष श्रेष्ठ असतो हे आपल्या मनात खोलवर रुजलेलं आहे.
म्हणून तर मग मुलींनी एकवेळ मुलांसारखं असलेलं आपल्याला चालतं. मग ते मुलांसारखं कपडे घालणं, केस कापणं असो किंवा धाडस, कर्तबगारी दाखवणं असो.(कर्तबगार असणं आजही पुरूषीपणाचं लक्षण आहे.)
पण हेच जर मुलगा समाजाच्या व्याख्येनुसार मुलीसारखा असेल, तर त्याचा स्वीकार होतो का? म्हणजे जर मुलगा संवेदनशील असेल, त्याला स्वैयंपाक करण्यात रस असेल, तो हळवा असेल, तर पालकांना हे चालतं का? तर नाही. त्याला बायल्या म्हणून चिडवतात. त्याला मर्द बनण्याचे, कणखर वागण्याचे डोस दिले जातात.
समानता मानणारे किती पालक आपल्या मुलाला स्वयंपाकघरात घेऊन जातात, घर सांभाळणं ही दोघांची जबाबदारी असते हे शिकवतात? खरं माणूसपण हे स्त्रीचा एक माणूस म्हणून आदर करण्यात आहे, हे सांगतात? याचा आज विचार करण्याची गरज आहे.
खऱ्या अर्थाने समानता आणण्यासाठी जेवढं मुलींना कणखर आणि सक्षम बनवण्याची गरज आहे तेवढंच मुलांना संवेदनशील बनवण्याची गरज आहे.

Posted on by हर्षल जाधव | 1 comment

सोमवार, ३ एप्रिल, २०१७

समाजस्वास्थ्य’ च्या निमीत्ताने....

काल अजित दळवी लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘समाजस्वास्थ्य’ हे संततीनियमनाबद्दल बोलणाऱ्या र. धों. कर्वे यांच्या कार्याचा वेध घेणारं नाटक माझ्या कोल्हापूर टीम सोबत पाहिलं.
रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या लोकविलक्षण जीवनकार्यावर आधारीत एक उत्कृष्ट नाटक !
गिरिश कुलकर्णी यांचा सर्वांगसुंदर अभिनय- अतुल पेठे यांच सशक्त दिग्दर्शन.
आणि...पत्नी मालतीबाईंच्या भूमिकेत राजश्री सावंत-वाड मामा वरेरकर - अभय जबडे ; डॉ. आंबेडकर - अजित साबळे. अहिताग्नी राजवाडे झालेले रणजीत मोहिते आणि शेटे वकिलाच्या भूमिकेतले कृतार्थ शेगांवकरही छाप पाडून गेले.
सारेच कलाकार उत्कृष्ट, बरं का!
पण सर्वात महत्वाचा भाग म्हणजे रधों कर्व्यांचे विचारप्रवर्तक आयुष्य!
कुटुंब नियोजन अथवा संतती नियमनाचा भारतातील आद्य प्रवर्तक - र. धों.!
स्वातंत्र्य पूर्व काळातील कर्मठ सनातनी समाज आणि या समाजाला लैंगिकता, स्त्री-पुरुष संबंध, व्यभिचार या विषयांवर लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या, संततिनियमनाचा प्रसार स्वतःच्या घरापासून करणाऱ्या, त्याविषयी विविध प्रयोग करणाऱ्या रघुनाथ धोंडो कर्वे या द्रष्ट्या माणसावर अश्लिलतेचा आरोप ठेवून गुदरलेल्या तीन खटल्यांची प्रकरणं म्हणजे हे नाटक...
र.धो....१९२०-५० काळातील युगप्रवर्तक पण तात्कालीन राजकारणामुळे कुजलेल्या अनेक महानुभावांपैकी एक!
या नाटकात सनातनी - कर्मठ हिंदू समाज, स्त्रियांचे लैगिक स्वातंत्र्य, लैगिक अंधश्रद्धा यांच्यावर प्रहार करणार्‍या एक युगद्रष्ट्याची झालेली ससेहोलपट अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. नतद्रष्ट समाजाने गुणीजनांची किती आणि कशी अवहेलना केली त्याचे ज्वलंत उदाहरण...
र. धों.चे सर्व क्रांतिकारी विचार अजून समाजात रुजलेले नाहीत. पण कुटुंब नियोजन, लैंगिक शिक्षण हे शब्दही ज्या समाजात वज्र्य होते, तिथे या संकल्पना स्वीकारार्ह बनवण्यात त्यांच्या जीवनकार्याचे निश्चितच योगदान आहे हे नाटक पाहत असताना लक्षात येते.
र. धों.ची मते सर्वमान्य झाली नसतील; पण त्यावर समाजात चर्चा झाली, विचारमंथन झाले, हीही गोष्ट महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनेच ज्ञाननिर्मिती होते आणि नवे विचार मूळ धरू शकतात. शिवाय ‘समाजस्वास्थ्य’च्या त्यावेळच्या नियमित वाचकांच्या सार्वजनिक व्यवहारात नाही, तरी व्यक्तिगत जीवनात या नव्या आणि वेगळय़ा विचारांचे काही ना काही सकारात्मक प्रतििबब कसं पडत गेले हे ही या नाटकाच्या माध्यमातून कळत जाते.
आज १२५ + कोटींनंतर देशात निर्माण झालेल्या प्रचंड अराजकता आणि र.धों.नी काळाचा वेध घेऊन तेंव्हाच केलेले प्रयत्न आज नाटक पाहताना कमालीचे वाटतात..
उत्कृष्ट रंगमंच ; प्रकाश योजना ; भाषाशैली ; संवाद सातत्य यामुळे १०० वर्षा पूर्वीचा काळ प्रेक्षकांसमोर मांडण्यात सर्व टीम पूर्णपणे यशस्वी ठरली आहे.
ज्यांना र.धों. कर्वे (महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सुपुत्र) यांच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल त्यांसाठी केवळ अचौक्य! (न चुकवण्यासारख) असं हे नाटक आहे.
नक्की पहा...*समाजस्वास्थ्य*
दिनांक 01/04/2017

Posted on by हर्षल जाधव | No comments