सोमवार, ३ एप्रिल, २०१७

समाजस्वास्थ्य’ च्या निमीत्ताने....

काल अजित दळवी लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘समाजस्वास्थ्य’ हे संततीनियमनाबद्दल बोलणाऱ्या र. धों. कर्वे यांच्या कार्याचा वेध घेणारं नाटक माझ्या कोल्हापूर टीम सोबत पाहिलं.
रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या लोकविलक्षण जीवनकार्यावर आधारीत एक उत्कृष्ट नाटक !
गिरिश कुलकर्णी यांचा सर्वांगसुंदर अभिनय- अतुल पेठे यांच सशक्त दिग्दर्शन.
आणि...पत्नी मालतीबाईंच्या भूमिकेत राजश्री सावंत-वाड मामा वरेरकर - अभय जबडे ; डॉ. आंबेडकर - अजित साबळे. अहिताग्नी राजवाडे झालेले रणजीत मोहिते आणि शेटे वकिलाच्या भूमिकेतले कृतार्थ शेगांवकरही छाप पाडून गेले.
सारेच कलाकार उत्कृष्ट, बरं का!
पण सर्वात महत्वाचा भाग म्हणजे रधों कर्व्यांचे विचारप्रवर्तक आयुष्य!
कुटुंब नियोजन अथवा संतती नियमनाचा भारतातील आद्य प्रवर्तक - र. धों.!
स्वातंत्र्य पूर्व काळातील कर्मठ सनातनी समाज आणि या समाजाला लैंगिकता, स्त्री-पुरुष संबंध, व्यभिचार या विषयांवर लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या, संततिनियमनाचा प्रसार स्वतःच्या घरापासून करणाऱ्या, त्याविषयी विविध प्रयोग करणाऱ्या रघुनाथ धोंडो कर्वे या द्रष्ट्या माणसावर अश्लिलतेचा आरोप ठेवून गुदरलेल्या तीन खटल्यांची प्रकरणं म्हणजे हे नाटक...
र.धो....१९२०-५० काळातील युगप्रवर्तक पण तात्कालीन राजकारणामुळे कुजलेल्या अनेक महानुभावांपैकी एक!
या नाटकात सनातनी - कर्मठ हिंदू समाज, स्त्रियांचे लैगिक स्वातंत्र्य, लैगिक अंधश्रद्धा यांच्यावर प्रहार करणार्‍या एक युगद्रष्ट्याची झालेली ससेहोलपट अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. नतद्रष्ट समाजाने गुणीजनांची किती आणि कशी अवहेलना केली त्याचे ज्वलंत उदाहरण...
र. धों.चे सर्व क्रांतिकारी विचार अजून समाजात रुजलेले नाहीत. पण कुटुंब नियोजन, लैंगिक शिक्षण हे शब्दही ज्या समाजात वज्र्य होते, तिथे या संकल्पना स्वीकारार्ह बनवण्यात त्यांच्या जीवनकार्याचे निश्चितच योगदान आहे हे नाटक पाहत असताना लक्षात येते.
र. धों.ची मते सर्वमान्य झाली नसतील; पण त्यावर समाजात चर्चा झाली, विचारमंथन झाले, हीही गोष्ट महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनेच ज्ञाननिर्मिती होते आणि नवे विचार मूळ धरू शकतात. शिवाय ‘समाजस्वास्थ्य’च्या त्यावेळच्या नियमित वाचकांच्या सार्वजनिक व्यवहारात नाही, तरी व्यक्तिगत जीवनात या नव्या आणि वेगळय़ा विचारांचे काही ना काही सकारात्मक प्रतििबब कसं पडत गेले हे ही या नाटकाच्या माध्यमातून कळत जाते.
आज १२५ + कोटींनंतर देशात निर्माण झालेल्या प्रचंड अराजकता आणि र.धों.नी काळाचा वेध घेऊन तेंव्हाच केलेले प्रयत्न आज नाटक पाहताना कमालीचे वाटतात..
उत्कृष्ट रंगमंच ; प्रकाश योजना ; भाषाशैली ; संवाद सातत्य यामुळे १०० वर्षा पूर्वीचा काळ प्रेक्षकांसमोर मांडण्यात सर्व टीम पूर्णपणे यशस्वी ठरली आहे.
ज्यांना र.धों. कर्वे (महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सुपुत्र) यांच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल त्यांसाठी केवळ अचौक्य! (न चुकवण्यासारख) असं हे नाटक आहे.
नक्की पहा...*समाजस्वास्थ्य*
दिनांक 01/04/2017

Posted on by हर्षल जाधव | No comments

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा