बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

आमची दिवाळी...

कुर ता. भुदरगड येथील पुरोगामी वाचन चळवळ आणि आम्ही कूरकर आयोजित विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिर..२०१७ च्या पहिल्या दिवशी मी राजवैभव आणि आमची लहान कार्यकर्ती सोनम जाधव ने शिबिरार्थींशी
अंधश्रध्दा निर्मुलन या विषयाच्या अनुशंघाने संवाद साधला..
मुलांचा उत्साह उदंड होता.. नेहमी प्रमाणे छान प्रतिसाद मिळाला...

गोविंद पाटील सर आणि टीमने शिबिराचे नियोजन उत्तम केले आहे.. तुमच्या या कार्यास सदिच्या...

Posted on by हर्षल जाधव | No comments

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७

आम्हाला संकटातून बाहेर काढणारा रियल सिंघम...

निवडणुक ड्यूटी म्हटलं कि अनेकांच्या मनात धस्स होत..
निवडणुक साहित्य हातात भेटल्यापासून ते संपूर्ण निवडणुक प्रक्रिया पूर्ण करून ते साहित्य परत जमा करण्याचा काळ हा एखाद्या मोहिमेपेक्षा कमी नसतो..

तर हा किस्सा सगळी निवडणुक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडून साहित्य जमा करायच्या ठिकाणी जात असतानाचा आहे..

बरोबर 6:00 वाजता आम्ही आमचे निवडणुक साहित्य घेऊन एस.टी मध्ये बसलो. सूर्यमामा आपली दिवसाची कामगिरी बजावुण संध्याछायेच्या कुशीत शिरला होता. चंद्र आपलं अस्तित्व सिध्द करण्यासाठी ढगांशी द्वंद्व करत होता... अंधार आपलं साम्राज्य हळूहळू स्थापन करत होता..एस.टी च्या ड्रायव्हर काकांनी एस.टीच्या लाईट कधीच सुरू केल्या होत्या..

वेगवेगळ्या गावातील अजून 11 निवडणुक केंद्रावरील टिम्स् ला घेऊन आम्हाला पुढे साहित्य जमा करायला जायचे होते....आता पर्यत 4 टीम एस.टी मध्ये आल्या होत्या. छोटी- छोटी गावं..लहान- लहान वस्त्या आणि या गावांना जाणारा चिंचोळा रस्ता... एका वेळी एकच वाहन जाईल असा मर्यादित व्यवस्था.. समोरून अचानक दुसरं वाहन आलं तर एकमेकांना वाट खुली करून देण्यासाठी एका वाहनाला रस्ता सोडून बाजूला वाहन घेऊन जायची वेळ यायची. भरीत भर म्हणजे आमच्या एस.टीला मागील बाजूचे लाईट देखील नव्हता. रस्त्याच्या बाजूला गवत पाऊसाच्या पाण्याने जोमान वाढलं होतं. त्यामुळे रस्ताच्या कड़ा रात्रीच्या अंधारात स्पष्ट दिसत नव्हत्या...
काही गावांकडे जायचे रस्ते हे हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत होते तर काही ठिकाणी यंदाच्या जोरदार पाऊसाने आख्खा रस्ताच धुऊन नेला होता..एवढी बेदरकार आवस्था अश्या रस्त्याने आमचा परतीचा प्रवास सुरू होता..कधी एकदा हे साहित्य जमा करतो आणि या निवडणुक ड्यूटीच्या अग्निदिव्यातून बाहेर पडतोय अशीच प्रत्येकाची भावना होती. दिवसभर मतदान प्रक्रिया डोळ्यात तेल घालून अगदी व्यवस्थित पार पाडून प्रत्येकालाच जाम कंटाळा आला होता..

अश्यातच एका गावाची वेस ओलांडून पुढील गावातील केंद्रावर जात असताना एका वळणावर आमच्या एस टी चे ड्रायव्हर काका टर्न घेत असताना अंधारात रस्त्याचा अंदाज चुकला आणि आमची एस.टी अगदी हळुवारपणे बाजूला असलेल्या खोलगट भागात उतरली..एवढी उतरली कि तिची एक बाजू पूर्णपणे जमिनीला समांतर टेकली.... दिवाळीच्या कल्पनाविलासात रमलेल्या आम्हा सर्व कर्मचा-र्यांना हा अचानक घडलेला प्रकार प्रथम लक्षातच आला नाही. काही कर्मचा-र्यांनी खाली उतरून पाहिलं तेंव्हा त्यांना धक्काच बसला..महाभारतील कर्णाचं चाक जसं रणांगणावर रूतून बसलं होतं अगदी तशीच काहीशी आवस्था आमच्या एस.टीच्या चाकाची झाली होती.. एका भल्या मोठ्या खड्यात गाडीच्या मागील चाकाने आपलं बस्तान बसवल होतं.. खड़्डा भलताच मोठा होता त्यातून गाडी परत वर येईल असं प्रथम दर्शनी पाहणाऱ्याला आजिबात वाटत नव्हतं...नेमकं काय झालय हे पहायला प्रत्येक जण तिथे जायचा आणि स्वत च्या अकलेचे तारे तोडून मोकळा व्हायचा. शिक्षकांची संख्या मोठी असल्याने कल्पना मांडायची काहीच कमतरता नव्हती. कोणी म्हणे आपण क्रेन बोलाऊन बस बाहेत काढू. कोणी म्हणे दूसरी एस.टी मागवू तर काही लोक तर आता काहीच होणार नाही अस म्हणत डोक्याला हात लावून बसले होते. अती दुर्गम भागात असल्याने मोबाईलला रेंज कधी शिवत होती तर कधी गायबची व्हायची..त्यामुळे फोन करून मदत भेटेल याची शक्यता देखील कमी होती.

त्याच वेळी निवडणुक पेट्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्या पोलीस टीम मधील एक हवालदार बाहेर आले.. आपल्या मोबाईलच्या टोर्च ने नेमकं काय झालय याची त्यांनी पाहणी केली. मनात काहीसा ठाम विचार करून अंगावर घातलेले काळे जाकेट त्यांनी  बाजूला केले आणि एस.टी च्या बाजूला वाढलेले गवत पहिला स्वत हून एकट्याने बाजूला केले. आता एस टी ची फसलेली बाजू स्पष्ट दिसू लागली होती.. चाकाकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला आणि आपल्या ईतर साथीदारांना नेमक काय करता येईल याविषयी चर्चा करून दगड गोळा करायला सुरवात केली. शक्य होईल तिथे जाऊन दगड जमवले. अंधार असल्याने दगड भेटणे देखील दुरापास्त झाले होते. जमिनीत रुतलेले बरेच खोलवर गेलेले दगड त्यांनी बाहेर काढून बसच्या चाकापुढे टाकायला सुरवात केली. खड़्डा भरायचं काही नावं घेत नव्हता. हा गडी देखील मागे हटायला तयार नव्हता. खड़्डा आपण दणकट दगडाने भरला तर चाक नक्कीच बाहेर येईल असा त्याचा आशावाद होता पण त्याचं हे काम मोठ्या दिमाखात हातावर हात ठेऊन पाहणा-र्यांनी त्यांना वेड्यात काढण्याचा शक्य तेवढा सगळा प्रयत्न केला. "सोडा ओ कशाला उगाच हात झाडत बसलाय..!!"
"हे शक्य नाही.. अहो चाक किती खाली गेलय बघा ते फिरेल का व्यवस्थित..!!"
"चाक बाहेर येऊन उपयोग काय पुढे एस.टी जायला जागा नको का..!!" अश्या अनेक गप्पा आजुबाजूला सुरू होत्या पण हा माणूस आपल्या प्रयत्नांवर ठाम होता...मनातील कल्पना जर बरोबर ठरली आणि ड्रायव्हर काकांनी गाडी बरोबर हन्डेल केली तर चाक बाहेर निघेल असं त्यांना मनोमन वाटतं होत म्हणूनच त्यांचा हा एकांगी प्रयत्न सुरू होता..अगदी ड्रायव्हर काका देखील त्यांना "हे शक्य होईल असं वाटत नाही" असं सांगून गेले होते.
शेवटी शक्य तेवढे आजुबाजूचे सगळे दगडे त्यांनी बाजूला लाऊन घेतले आणि ड्रायव्हर काकांना एस.टी स्टार्ट करून प्रयत्न करायला लावला आणि काय आश्चर्य त्यांनी त्यांच्या कल्पनेने योग्य ठिकाणी लावलेले दगड कामी आले आणि बस अगदी आरामात पुन्हा रस्त्यावर आली आणि एकच जल्लोश झाला...
सगळ्यांचा जीव भांड्यात पडला...चेहऱ्यावरील चिंतेच्या रेषा गायब होऊन एक स्मित हास्य प्रत्येकाच्या ओठांवर दिसू लागलं...

फुकटचे सल्ले देणारी तोड़ं आता त्या पोलीसाचे कौतुक करण्यात व्यस्त होते..एकाही दगडाला हात न लागलेले हात त्या हवालदारांचे अभिनंदन करायला पुढे येत होते.. लोक पटापट एस.टीत चढ़ले..पुन्हा बस मध्ये देखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता.. पुढे नव्याने एस.टी त येणाऱ्या टीम्सला हा सम्पूर्ण प्रकार सांगितला कि ते देखील त्यांचं कौतुक करायचे...

फोटोत दिसणारी ती तीच व्यक्ति आहे *श्री. संदीप भगवान काशीद..*ज्यांनी आम्हाला अगदी सुखरूप त्या संकटातून बाहेर काढून रात्री अगदी अपेक्षित वेळेवर म्हणजे रात्री 9:00 वाजता नियोजित ठिकाणी निवडणुक साहित्य जमा करायला पोहचवले...
अभिनंदन स्वीकारताना ते आवर्जून म्हणाले कि "आपण शक्य होईल तेवढे सगळे प्रयत्न करायचे..मागे हटायचं नाही.."आपल्या क्रुतीतून त्यांनी हेच दाखवून दिलं होतं...

प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या आजुबाजूला उपलब्ध असलेल्या साधनांचा कल्पकतेने वापर करून आपल्याला समस्या सोडविता आली पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनात यापेक्षा वेगळं असं काय असतं..

पडद्यावरील कॅमेरा अड्जस्ट करून स्टन्ट करणारा सिंघम होण्यापेक्षा रियल लाईफ मधील आपली कर्तव्य व्यवस्थित पार पाडणारा संदीप काशीद सारखा पोलीस मला लाख मोलाचा वाटतो...

संदीप भाऊ आम्हाला तुमचा अभिमान वाटतो..
थँक्स महाराष्ट्र पोलीस...
तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत..

- हर्षल जाधव
9637351400

Posted on by हर्षल जाधव | 1 comment

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

ग्रेट_भेट विथ ज्येष्ठ तमाशा कलावंत लावणी साम्राज्ञी सौ. मंगला बनसोडे




समताचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नियोजित स्थळी जात असताना अचानक एका प्रसिद्ध व्यक्तीमत्वा सोबत फोटो क्लिक करायची संधी भेटली.. कोण हि व्यक्ती तर ज्यांच्या शिवडीतील बांगो गाण्यामुळे 22 हजार रसिक शांत झाले होते, लावणीमध्ये चित्रपटातील कॉश्च्यूम ज्यांनी प्रथम आणले, नाचता नाचताच ज्यांना प्रसवकळा येऊ लागल्या. मंचावरच काही गावकरी महिलांच्या साथीने त्यांची डिलीव्हरी देखील झाली. विशेष म्हणजे प्रसुतीनंतर अवघ्या काही वेळातच ज्या पुन्हा मंचावर आल्या आणि ज्यांनी  नृत्याविष्कार पुन्हा सादर केला..वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी पायात  घुंगरू आलं ते आजतागायत त्याचा छनछनाट सुरूच आहे. सुख दु:खाच्या हिंदोळ्यावर लहरत समाजमनाला आनंद देण्याचे काम करत ही कला जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी स्वतःच उभं आयुष्य वेचलं अश्या ज्येष्ठ तमाशा कलावंत लावणी साम्राज्ञी मंगला बनसोडे यांची हि ग्रेट भेट...

मनात कोठेही आपण फार मोठी सेलिब्रेटी असल्याचा किंचितही भाव नसलेल्या, प्रचंड मनमेळावू असं हे व्यक्तीमत्व..आम्हा सगळ्याची त्यांनी अगदी आपुलकीने ओळख करून घेतली. समता चा वाढदिवस असल्याचे कळताच त्यांनी तिला भरभरून सदिछया दिल्या...

अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांना भारत सरकारचा राष्ट्रपती पुरस्कार देखील जाहीर झाला आहे त्याबद्दल आम्ही सगळ्यांनी त्यांना सदिछया दिल्या... यापूर्वी त्यांची आई विठा भाऊमांग नारायणगावकर आणि वडील भाऊमांग नारायणगावकर यांना देखील हा पुरस्कार जाहीर झाला होता. एकाच कुटुंबातील तिघांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे बनसोडे कुटुंबाने राष्ट्रपती पुरस्कारांमध्ये हॅट्ट्रीक मिळवली आहे.

बोलण्याच्या ओघात त्यांनी, "हा पुरस्कार म्हणजे सातारकरांच्यासाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे" असे सांगितले पण आमच्या अजय ढाणेने "हि तर नुसत्या सातारकारांचीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या अभिमानाची बाब आहे" असं सांगून त्यांना सदिछया दिल्या. अखेर त्याचा निरोप घेऊन आम्ही आमच्या पुढील प्रवासाला निघालो..

दिनांक १०/१०/२०१७
- हर्षल जाधव
9637351400