सोमवार, ३ जून, २०१९

रविश कुमारांचं 'द फ्री व्हॉइस'


लोकशाहीच्या चौथा खांब ज्यावेळी प्रस्थापितांची ओझी उचलण्यात धन्यता मानतो किंवा त्यातच आपले सौख्य सामावले आहे अशी परिस्थिती त्यांच्यासाठी निर्माण केली जाते तेंव्हा काही मोजकीच धैर्यवान लोक पत्रकारितेचा आत्मा जिवंत ठेवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अव्याहतपणे सत्य मांडत राहतात अश्या मोजक्या पत्रकारांपैकी एक असणारे रविश कुमार..
रविश कुमारांचं 'द फ्री व्हॉइस' हे पुस्तक आजच वाचून पूर्ण केले.

रविश कुमारांनी सत्य मांडत असताना झुंडीकडून, समूहाकडून, असत्यशी असणारे हितसंबंध जोपासणाऱ्या लोकांकडून येणाऱ्या धमक्या, फेक न्यूज, ट्रोलिंग यांचे विस्तृत विवेचन या पुस्तकात मांडले आहे.

पुस्तकात त्यांनी 'बोलते व्हा', 'यांत्रिक लोक आणि नव्या लोकशाहीची इमारत', 'भयपेरणीचा राष्ट्रीय प्रकल्प', 'जिथे झुंड असते, तिथे हिटलरचा जर्मनी असतो', 'आपण जनता आहोत', 'बाबालोकांचा देश', 'प्रेमाची गोष्ट', 'खाजगीपणाचा मूलभूत हक्क' आणि 'चला, स्वातंत्र्यदिनानिमित्त आईस्क्रीम खाऊ' या लेखांचा समावेश आहे.

अनेक विषयांचा परामर्श घेतानाच लोकांचा सोशल मीडिया किंवा मुख्य प्रवाहातील मीडियातून बोलण्याचा अवकाश किती आहे आणि तो अवकाश दिवसेंदिवस कसा कोंडला जातो आहे यावरची निरीक्षणे ते मांडतात.

'प्रेमाची गोष्ट' या लेखाचा मला येथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या लेखात रवीश कुमार म्हणतात, 'भारतात प्रेम करणं एक लढाई आहे.' त्यांचे हे शब्द सत्याची प्रचिती देऊन जातात. या लेखात रवीश कुमारांनी चित्रपटातली प्रेमाची व्याख्या सांगितली आहे. गरीब-श्रीमंत दरी, जातीच्या भिंती अनेक चित्रपटांतून दाखवण्यात येतात. त्यामुळे प्रेम करताना जातीच्या रिंगणातच प्रेमाच्या शक्यता शोधाव्यात असं उपहासानं रवीश कुमार म्हणतात.

बहुतांश चित्रपट व्यवस्थेला धक्का न बसू देता तयार केले जातात. यात इतकं पराकोटीचं काल्पनिक विश्व उभं केलेलं असतं की, नायक-नायिका सुंदर असतात, छान छान गाणी गातात. ही गाणी गुलजार किंवा आनंद बक्षी यांच्यासारख्या ख्यातनाम गीतकारांकडून लिहून घेतली जातात आणि कडू-गोड प्रसंगानंतर पळून जाण्याचा संदेश यातून दिला जातो.
प्रत्यक्षातही ज्यांनी आंतरजातीय विवाह केले आहेत, विशेषतः राजकारणातल्या व्यक्ती असतील तर सार्वजनिकरीत्या ते आपलं प्रेम व्यक्त करत नाहीत. मतदार नाराज होतील अशी भीती त्यांना वाटत असते. खूप क्वचित वेळा काही लोक हे जाहीरपणे बोलण्याचं धाडस करतात आणि त्याची किंमतही मोजतात. रवीश कुमार म्हणतात, आपल्याकडे प्रेम करण्यासाठी जागा उपलब्ध नाहीत, याबाबत ते आपली भूमिका ठामपणे मांडत असंही लिहितात की, "मी जर नेता असतो तर प्रत्येक शहरात एक प्रेम उद्यान बांधल असतं आणि आनंदाने पुढची निवडणूक हरलो असतो कारण समाजाने त्याला मान्यता दिली नसती."

हुंड्याच्या अर्थशास्त्रावरही रवीश कुमार प्रकाशझोत टाकतात. प्रेम असलं तरी हुंडा देणं-घेणं यात त्या तरुणालाही वावगं वाटत नाही, याबद्दलची खंत व्यक्त करून रवीश कुमार अशा तरुणांना 'चुल्लूभर पाणी में डूब मरो' असं वैतागून म्हणतात.

प्रेम माणसाला जबाबदार बनवतं. प्रेमानं त्यांना जग बदलायचं असतं. ऋतूंचा ताल प्रेमिकांच्या हृदयात असतो, अशी हळुवारपणे प्रेमाची ताकद सांगत असतानाच प्रेमाचं दुबळेपणही रवीश कुमार सांगतात. प्रेम करणं म्हणजे केवळ 'आय लव्ह यू' म्हणणं नसून दुसर्‍याबरोबरच स्वतःलाही ओळखणं असतं.

ऑनर किलिंगची उदाहरणं देताना रवीश कुमार प्रेम, हिंसा, धर्म, याबरोबरच मुलगी नको म्हणून पोटातच मारून टाकणार्‍या पालकांच्या मानसिकतेवरही प्रहार करतात.
प्रेमाला मोकळं अवकाश मिळायला हवं. त्या मोकळ्या अवकाशात प्रेम बहरायला हवं आणि प्रेमातून माघार घेणार्‍या प्रेमिकांनी डरपोक व्हायचं की, स्वतः निर्णय घेऊन आपलं प्रेम यशस्वी करायचं हे ठरवायला हवं.
रवीश कुमारांना ऐकणं हा जेवढा आनंददायी अनुभव आहे, त्याचबरोबर त्यांचं लिखाण वाचणं हाही अंतर्मुख व्हायला भाग पाडणारा अनुभव आहे.
पुस्तकाचा मराठी अनुवाद सुनील तांबे यांनी केला आहे तर प्रस्थावना फेसबुक मित्र  यादीतील @मुग्धा कर्णिक यांनी केला आहे.

हे पुस्तक कधी तिरकस, कधी सडेतोड आणि सातत्याने सखोल गंभीरी शैलीत, देशाच्या सद्य परिस्थितीवर वृत्तांकना सारखीच टिपण्णी करते. हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि त्यावर विचार करावा असे आहे.

- हर्षल जाधव , कोल्हापूर 9637351400

बुधवार, १५ मे, २०१९

'जात बघून प्रेम करा' असा शासनाने जी.आर काढावा..


'जात बघून प्रेम करा' असा शासनाने जी.आर काढावा..
पालकांनी लहानपणापासून मुलांना माणसांवर प्रेम करा म्हणायचे तुणतुणे वाजवणे बंद करावे..
आपली जात, धर्म, वंश किती महत्वाचा असतो याची पट्टी लहानपणापासून वदवून घ्या... अभ्यासक्रमात एखादा धडाच घुसवला तरी चालेल...
आपल रक्त आणि त्या दुसऱ्या खालच्या जातीतील व्यक्तीचे रक्त कसे वेगळ आहे हे पटवून सांगण्यासाठी त्या रक्तात निळा, हिरवा, भगवा थोडा थोडा रंग मिक्स करा... नाहीच रंग बदलला तर रुढी, परंपरा, घराणे नावाचा अत्तर शिंपडा त्यावर ...घरात याची काही सेंपल ठेवून घ्या..
प्रेमातून नव्हे तर फक्त आणि फक्त वासनेतून मुलांना जन्म द्या..तेंव्हाच आपल्या या प्राणांपेक्षाहि अधिक किंमतीची असलेली जात, धर्म आपल्याला टिकवता येईल...
पोटच्या पोरांना रक्ताच्या थारोळ्यात बघून आसुरी आनंद कसा घ्यायचा याचा crash कोर्स सुरू करा...
पेटवून, गळा दाबून, सुपारी देऊन यात अजून काही मार्ग add होतात का ते गूगल करा...
प्रेमातून (अनेकांच्या भाषेत लफड) लग्न केले म्हणून पोरीला संपवून 56 इंच छाती घेऊन स्वतःहून पोलीस चौकीत हजर व्हायची हिम्मत आणायला जुनी उदाहरणे वाचत जा..यामुळे प्रेरणा मिळेल मेलेल्या मनाला...
पण
हे सगळं करूनहि,
रुक्मिणी-मंगेश, प्रणय-अमृता, इंद्रजित-मेघा
पुन्हा पुन्हा जन्माला येतील
आपल्या प्राणांची आहुती देऊन
जाती धर्माला मूठमाती देतील...
- हर्षल जाधव,
9637351400
Posted on by हर्षल जाधव | No comments